‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ हा चित्रपट विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित करत आहेत. ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटात आमिर खान आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. आमिर व अमिताभ ही जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र दिसणार आहे. आमिरच्या अपोझिट सना शेख आणि कॅटरिना कैफ या दोघी आहेत. येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाद्वारे आमिर खान आणि अमिताभ बच्चन पहिल्यांदाच एकत्र काम करत असल्याने या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना चांगलीच लागली आहे. या चित्रपटाने निर्माते देखील या चित्रपटाच्या निर्मितीत कोणतीही कसर शिल्लक राहू नये याची काळजी घेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती यश राज बॅनरची असून यश राज हे बॉलिवूडमधील महत्त्वाच्या प्रोडक्शन हाऊसपैकी एक मानले जाते. यश राजने आजवर अनेक हिट चित्रपट दिलेले आहेत. ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटासाठी निर्माते प्रचंड खर्च करत आहेत. या चित्रपटाच्या आऊटडोअर चित्रीकरणासाठी निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा वाहिला असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाच्या काही दृश्यांचे चित्रीकरण नुकतेच माल्टा येथे करण्यात आले. या चित्रपटातील फँटसी, अॅक्शन हे प्रेक्षकांना खरेखुरे वाटावे यासाठी चित्रपटाच्या टीमने प्रयत्न केले आहेत आणि त्यासाठी प्रचंड खर्च करण्यात आला आहे. आजवर बॉलिवूडच्या इतिहासात कोणत्याच आऊटडोर चित्रीकरणाला इतका पैसा वापरण्यात आलेला नव्हता. याविषयी विशेष सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विकटोर म्हणजेच विजय कृष्णा आचार्य यांना फँट्सी आणि खरे जग एकच वाटेल असे पडद्यावर साकारायचे होते. त्यामुळे त्यांनी बॉलिवूडमध्ये आजवर न वापरण्यात आलेले लोकेशन वापरायचे होते. तसेच या लोकेशनवर दोन मोठ्या बोटी उभ्या राहातील इतकी जागा हवी होती. त्यामुळे माल्टाची निवड करण्यात आली. या बोटीदेखील खास चित्रपटासाठी बनवण्यात आलेल्या असून हॉलिवूड चित्रपटांमध्ये वापरण्यात येणाऱ्या बोटींप्रमाणेच या बोटी आहेत. माल्टा येथे राहून जवळजवळ ४५ दिवस या चित्रपटाच्या टीमने चित्रीकरण केले असून हे चित्रीकरण बॉलिवूड चित्रपटातील सगळ्यात महागडे आऊटडोर चित्रीकरण बनले आहे.
‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चे आऊटडोर चित्रीकरण ठरले आजवरचे सर्वात महागडे चित्रीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 6:27 PM