बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या वाढदिवसापूर्वीच त्याला सर्पदंश झाल्यामुळे सगळीकडे गोंधळ उडाला होता. पनवेलनजीक असलेल्या वाजेपूर या गावात सलमानचा फार्म हाऊस असून येथे त्याला सापाने दंश केल्याचं समोर आलं. सर्पदंश झाल्यानंतर सलमानला कामोठे येथे असलेल्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्याला रविवारी सकाळी ९ वाजता घरी सोडण्यात आलं. विशेष म्हणजे सलमानला साप चावल्यानंतर चाहते प्रचंड चिंतेमध्ये होते. यातच त्याच्या फार्महाऊसबाहेरही फोटोग्राफर्सने गर्दी केली होती. विशेष म्हणजे नुकतीच सलमानने एएनआयला मुलाखत दिली असून नेमका सर्पदंश कसा झाला आणि पुढे काय घडलं हे सांगितलं. इतकंच नाही तर या गडबडीत एक मजेशीर किस्सा घडल्याचंही त्याने सांगितलं.
"फार्म हाऊसमध्ये साप आढळून आल्यामुळे सगळेच जण घाबरले होते. यावेळी मी काठीने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना तो काठीवरुन माझ्या हातावर आला आणि त्याने तीन वेळा मला दंश केला", असं सलमान म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "साप चावल्यावर उपचार वगैरे झाल्यानंतर माझ्या वडिलांनी मला एक प्रश्न विचारला. "काय झालं? साप जिवंत आहे का?", असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर मीदेखील त्यांना मस्करीत उत्तर दिलं. "टायगर भी जिंदा है, और साप भी जिंदा है," असं खट्याळ उत्तर दिलं.
दरम्यान, सलमानला साप चावल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. परंतु, हा साप बिनविषारी असल्यामुळे सलमानवरील संकट टळलं. सलमान काही दिवसांपूर्वीच 'दबंग रिलोडेड' टूरवरुन भारतात परतला आहे. ' सध्या तो किक २', 'टायगर ३' या चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे.