एकीकडे साऊथच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे तर दुसरीकडे बॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांची निराशा करत आहेत. आजच रिलीज झालेला टायगर श्रॉफ (Tiger Shroff) व तारा सुतारियाचा (Tara Sutaria ) ‘हिरोपंती 2’ ( Heropanti 2) हा सिनेमा त्याचं ताजं उदाहरण. आज सिनेमा चित्रपटगृहांत धडकला आणि लागलीच नेटकऱ्यांनी या सिनेमाला ट्रोल करायला सुरूवात केली.‘हिरोपंती 2’ रिलीज होऊन काही तास होत नाही तोच सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला. अनेकांनी टायगरच्या या सिनेमाची जोरदार खिल्ली उडवली.
एका व्हायरल मीम्समध्ये मनोज वाजपेयीच्या सिनेमाचा एक सीन शेअर करत, त्यावर‘ये क्या बवासीर बना दिए हो,’असं लिहिलेलं आहे.
एका मीममध्ये एक व्यक्ती रूग्णालयात बेडवर लेटलेला दिसतोय आणि आपल्या या अवस्थेसाठी तो ‘हिरोपंती 2’ला जबाबदार ठरवतो आहे.
‘हिरोपंती’ हा टायगरचा पहिला सिनेमा होता. 2014 मध्ये या चित्रपटाद्वारे टायगरचा डेब्यू झाला होता. 8 वर्षानंतर टायगर या चित्रपटाचा सीक्वल ‘हिरोपंती 2’ घेऊन आला आहे.
चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीने लैला जादूगाराचं पात्र साकारलं आहे. हॅकर असलेला लैला सर्व भारतीयांची बँक अकाऊंट्स हॅक करून तो पैसा स्वत:च्या घशात घालण्याचा तयारीत असतो. बबलू अर्थात टायगर हाही एक हॅकर असतो, ज्याला पैसे कमवून शोबाजी करण्यात रस असतो. एका सरकारी मिशनअंतर्गत लैलाची पोलखोल करण्यासाठी बबलूची मदत घेतली जाते. पण बबलू लैलाच्या बहिणीच्या प्रेमात पडतो. इतकंच नाही तर लैलाच्या प्लानमध्ये सामील होतो. अमृता सिंगसोबत भेट झाल्यानंतर बबलू भानावर येतो आणि मग लैलाला तुरुंगात पोहोचवण्यासाठी कंबर कसतो, असं या चित्रपटाचं ढोबळ कथानक आहे.