Join us

टायगर श्रॉफ ते नेहा कक्कर, १४ सेलिब्रिटींची ईडीकडून चौकशी होणार, ऑनलाईन गेमिंगचं कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 3:29 PM

कंपनीने आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी झाले होते.

बॉलिवूड आणि ईडी (ED) हे कनेक्शन पुन्हा परत आलं आहे. यावेळी टायगर श्रॉफ (Tiger Shroff), सनी लियोनी (Sunny Leone), नेहा कक्करसह (Neha Kakkar)अनेक सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आले आहेत.महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप या कंपनीवर ईडीने छापेमारी केली. यामध्ये तब्बल 417 कोटी रुपये जप्त केले. या कंपनीने आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी झाले होते. त्यामुळे आता हे सेलिब्रिटी देखील ईडीच्या रडारवर आहेत.

महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप कंपनीच्या संस्थापकांपैकी एक सौरभ चंद्राकरच्या लग्नाचा भव्य सोहळा पार पडला. लग्नापेक्षा जास्त तर तो इव्हेंटच झाला होता. या लग्नात बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावत परफॉर्म केले. लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या कंपनीसंदर्भात ईडीने छापेमारी केली असता लग्नाच्या इव्हेंटचीही ईडीने तपासणी केली. दरम्यान ईडी अधिकाऱ्यांनी ४१७ कोटी रुपये जप्त केले. या सोहळ्यात १४ बॉलिवूड कलाकार आले होते. टायगर श्रॉफ, सनी लियोनी,  राहत फतेह अली खान, आतिफ अस्लम, अली अजगर, विशाल ददलानी, नेहा कक्कड, भारती सिंह, भाग्यश्री, एली अवराम, पुलकित, क्रिती खरबंदा,कृष्णाभिषेक आणि नुसरत भरुचा यांचा समावेश आहे.

ईडीने ही कारवाई मुंबई, कोलकता आणि भोपाल या शहरांमध्ये केली आहे. महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप कंपनीचे इव्हेंट परदेशातही झाले होते. बॉलिवूड कलाकारांना परफॉर्म करण्यासाठी रक्कम देण्यात आली होती. या इव्हेंटचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ईडीच्या कारवाईनंतर बॉलिवूडकरही चौकशीच्या कचाट्यात सापडतात का हे बघणं महत्वाचं आहे

टॅग्स :अंमलबजावणी संचालनालयटायगर श्रॉफसनी लियोनीनेहा कक्कर