बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून दररोज त्यांच्या ब्लॉग आणि ट्विटरवर पोस्ट शेअर करून चाहत्यांशी संवाद साधत असतात. त्यांचे मत, विचार शेअर करत असतात आणि कधीकधी त्यांच्या पोस्ट चर्चेतदेखील येताना दिसतात. नुकतेच अमिताभ बच्चन यांनी असं काही ट्विट केलं आहे, जे पाहून चाहते हैराण झाले आहेत आणि नेमकं काय झालं आहे, अशी विचारणा पोस्टवर करत आहेत.
शुक्रवारी, रात्री ८.३४ वाजता, बिग बींनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केली आहे. त्यांनी ट्विट केले की, Time To Go (जाण्याची वेळ आली आहे). ट्विट छोटे असले तरी ते वाचून चाहते संभ्रमात पडले आहेत. अमिताभ यांनी जे लिहिले ते वाचून चाहते गोंधळले आहेत आणि अनेक प्रश्न विचारू लागले आहेत. ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये त्यांच्या चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली. एका चाहत्याने लिहिले की, 'असे बोलू नका सर.' दुसऱ्या चाहत्याने विचारले, 'काय झालं सर?' तर आणखी एका चाहत्याने ट्वीट केले की, 'सर, तुम्ही जे लिहित आहात त्याचा अर्थ काय?'
बॉलिवूडमधून बिग बी घेताहेत संन्यास?
काही चाहते असा अंदाज लावत आहेत की त्यांची ही पोस्ट बिग बी अभिनयातून निवृत्ती घेण्याबद्दल आहे. बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक संबोधले जाते. ते अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. वयाच्या ८२ व्या वर्षीही त्यांचे कामाप्रती असलेले प्रेम आणि वचनबद्धता कौतुकास्पद आहे. त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनने अलिकडेच बच्चन यांच्या समर्पणाचे कौतुक केले होते.
अमिताभ बच्चन यांनी १९६९ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट 'भुवन शोम' मध्ये कथावाचक म्हणून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. त्याच वर्षी त्यांनी 'सात हिंदुस्तानी' सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, ज्यामध्ये त्यांनी उत्पल दत्त आणि अन्वर अली यांच्यासारख्या कलाकारांसह सात नायकांपैकी एकाची भूमिका केली होती.
अभिषेकने केलं होतं वडिलांचं कौतुक
"आम्ही मुंबईत एका छान वातानुकूलित खोलीत बसून ही मुलाखत करत आहोत, छान कॉफी घेत आहोत. ८२ वर्षीय दिग्गज अभिनेता सकाळी ७ वाजल्यापासून केबीसीचे शूटिंग करत आहेत. ते एक आदर्श घेऊन पुढे जात आहेत," असे अभिषेक बच्चनने एका मुलाखतीत वडिलांबद्दल म्हटले होते.
नेटकऱ्यांमध्ये रंगलीय ही चर्चा
तर काही चाहत्यांना वाटतंय की, ते कौन बनेगा करोडपती शोला रामराम करणार आहेत. २००० सालापासून अमिताभ बच्चन या शोचं सूत्रसंचालन करत आहेत. फक्त तिसऱ्या सीझनचे सूत्रसंचालन शाहरूख खानने केले होते. तर काहींना वाटतंय की, बिग बी सोशल मीडिया सोडणार आहेत. खरेतर बिग बींनी ट्विटमध्ये जाण्याबद्दल कोणत्या संदर्भात लिहिले आहे किंवा ते कशाबद्दल बोलत आहेत, हे स्पष्ट केलेले नाही. पण या ट्विटनंतर चाहते काळजीत पडले आहेत आणि त्यांनी असे का लिहिले आहे, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.
वर्कफ्रंटअमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती १६' शोचे सूत्रसंचालन करत आहेत. शोमधील त्यांचा दमदार आवाज आणि खास शैली चाहत्यांना आवडते. सिनेमाबद्दल सांगायचे तर शेवटचे ते गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला 'कल्की 2898' मध्ये दिसले होते. त्यानंतर आता ते या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातही दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांनी अश्वत्थामाची भूमिका साकारली आहे. याशिवाय बिग बी दीपिका पादुकोणसोबत 'द इंटर्न'च्या रिमेकमध्येही दिसणार आहेत.