जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतातही या व्हायरसचा विळखा घट्ट होत आहे. दिवसागणिक भारतात करोना संक्रमित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. एका अभिनेत्रीच्या वडिलांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत असल्याने त्यांना नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि तृणमूलची खासदार नुसरत जहाँचे वडील मोहम्मद शाहजहां यांना रविवारी संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नुसरतने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, माझ्या वडिलांना ताप असून ते काही वर्षांपासून डायबेटिजने ग्रस्त आहेत. त्यांना डायबेटिज असल्याने त्यांच्या शरीरावर औषधांचा परिणाम लगेचच होत नाहीये. त्यामुळे त्यांना आम्ही रुग्णालयात दाखल केले आहे. आता त्यांचा ताप कमी झालेला असून त्यांच्या तब्येतीत प्रचंड सुधारणा होत आहे.
पुढे नुसरतने सांगितले की, माझे वडील कुठेच बाहेर फिरायला गेले नव्हते. तसेच लॉकडाऊन दरम्यान देखील ते घराच्या बाहेर देखील पडलेले नाहीत. पण तरीही खबरदारी म्हणून आम्ही कोरोना व्हायरसची टेस्ट केली असून त्याचा रिपोर्ट लवकरच मिळेल... माझे वडील रुग्णालयात असले तरी आम्ही अद्याप त्यांना भेटायला गेलेलो नाहीये. आम्ही सगळे घरीच थांबत असून ते देखील लवकरात लवकर घरी येतील अशी आम्हाला खात्री आहे.
नुसरत सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सना घराच्या बाहेर पडू नये असे सतत सांगत असून तिने मुख्यमंत्री साहाय्यक निधीत मदत देखील केली आहे.
अख्ख्या देशात कोरोनाने हैदोस घातला आहे. देशातही कोरोनाचा प्रकोप वाढत असताना सगळीकडे दहशतीचे वातावरण आहे. खबरदारी म्हणून भारतात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.