सध्या बॉक्स ऑफिसवर शाहिद कपूरचा ‘कबीर सिंग’ हा चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरतोय. या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला जमवला आहे. तेलुगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा हा रिमेक आहे. विशेष म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये अर्जुन रेड्डी हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: उचलून घेतलं होतं. या चित्रपटामध्ये अभिनेता विजय देवरकोंडा याने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या यशानंतर सतत चर्चेत राहणारा विजय लवकरच एका चित्रपटामध्ये झळकणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये तो व्यस्त असून काही दिवसापूर्वीच त्याने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. मात्र या कार्यक्रमामध्ये विजय एका कारणामुळे भडकल्याचं पाहायला मिळालं.
विजय लवकरच ‘डियर कॉमरेड’ या तेलुगू चित्रपटामध्ये झळकणार असून या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना ही स्क्रीन शेअर करणार आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमामध्ये विजयला या चित्रपटासंदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांमध्ये त्याने चित्रपटामध्ये रश्मिकासोबत केलेल्या लिपलॉकबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता. हा प्रश्न ऐकल्यानंतर विजय प्रचंड संतापला.
‘लिपलॉकचा नक्की अर्थ काय असतो ? मला असं म्हणायचं की, मला हा शब्दच मुळात आवडत नाही. हे बघा तुम्ही अनेक वेळा विरोधातील गोष्टी लिहिता, त्यावेळी तुमची ती भावना असते. राग व्यक्त करणं ही एक भावना आहे. तुम्ही रडता ही देखील एक भावना आहे. त्याप्रमाणेच एखाद्याला किस करणं ही सुद्धा एक भावनाच आहे, ही भावना आपण एखाद्यासमोर व्यक्त करत असतो,’ असं विजय म्हणाला.
पुढे तो म्हणतो, ‘किस करणं ही एक भावना आहे. त्यामुळे त्या भावनांचा आदर केला पाहिजे. जर चित्रपटासाठी एखादा क्षण लिहिला असेल आणि त्या नात्यातील एक नवा पैलू उलगडायचा असेल तर त्या तो क्षण जीवंत करणं गरजेचं असतं. जर चित्रपटात त्या सीनची गरज नसेल तर आम्ही तसं करणार आहे.’
दरम्यान, ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटानंतर अभिनेता विजय हा तरुणींच्या गळ्यातील ताईत झाला आहे. टॉलिवूडपासून बॉलिवूडचेही प्रेक्षक त्याच्या अभिनयाचे आणि स्टाइलचे दिवाने झाले आहेत.