नवी दिल्ली - सध्या तुरुंगात असलेला ठकसेन सुकेश चंद्रशेखर याच्या चौकशीमधून अनेक धक्कादायक गौप्यस्फोट होत आहेत. सुकेश चंद्रशेखर हा २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी मुख्य आरोपी आहे. या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्याकडे आधीच चौकशी झाली आहे. आता या प्रकरणात बॉलिवूडमधील अजून काही नावे समोर येण्याची शक्यता आहे. ईडीच्या सूत्रांनुसार सुकेश चंद्रशेखर हा तिहार तुरुंगात एक मोठे आणि आलिशान ऑफिस चालवत होता. तिथे त्याला सर्व सुविधा मिळत होत्या. एवढेच नाही तर सुकेश चंद्रशेखर तुरुंगामध्ये आलिशाना पार्ट्याही करत असे. या पार्ट्यांमध्ये त्याच्या मैत्रिणीही सहभागी होत असत. धक्कादायक बाब म्हणजे तुरुंगामध्ये त्याला भेटण्यासाठी बॉलिवूडमधील १० अभिनेत्री आणि सुपर मॉडेल्स येत असत.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाठक सुकेश चंद्रशेखर तिहार तुरुंगामधूनच आपले आलिशान ऑफिस चालवत असे. तुरुंगात तयार केलेले हे ऑफिस सर्व सुविधांनी युक्त असे होते. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री लीना मारिया पॉल हिने आपल्या जबाबात सांगितले की, तुरंगातील या ऑफिसमध्ये सोफा, फ्रिज, टीव्हीसारख्या सुविधा होत्या. तसेच लीना हिला तुरुंगात जाण्यासाठी पूर्ण अॅक्सेस होता. तसेच ती रजिस्टरमध्ये कुठलीही एंट्री न करता तुरुंगात जात असे. तिने सांगितले की, चंद्रशेखर तुरुंगातच चिकिन पार्ट्या करायचा. त्या पार्ट्यांमध्ये त्याच्या महिला मैत्रिणीही यायच्या. समोर येत असलेल्या माहितीनुसार तुरुंगातील हे ऑफिस सुरू राहावे म्हणून सुकेश चंद्रशेखर हा तुरुंगातील अधिकाऱ्यांना दरमहा एक कोटी रुपये द्यायचा. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, नोरा फतेही यांच्यासह किमान १० सुपर मॉडेल्स आणि अभिनेत्री सुकेशला भेटण्यासाठी तुरुंगात जात असत.
२०१७ मध्ये निवडणूक आयोग लाचखोरीच्या प्रकरणामध्ये सुकेश चंद्रशेखर याला एका हॉटेलमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची रवानगी तिहार तुरुंगात केली होती. त्याने एआयएडीएमके पक्षातील (अम्मा) गटाला निवडणूक चिन्ह मिळवून देण्यासाठी ५० कोटी रुपयांची डील केली होती. तसेच त्याने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी पैसे घेतले होते. दरम्यान, अटक झाली तेव्हा पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे १.३ कोटी रुपये जप्त केले होते.