Join us

'ट्रॅजेडी किंग' दिलीप कुमार सुपुर्द-ए-खाक, पाणावलेल्या डोळ्यांनी सायरा बानोंनी घेतला अखेरचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2021 5:55 PM

९८ वर्षीय दिलीप कुमार यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

बॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांचे आज निधन झाले. ९८ वर्षीय दिलीप कुमार यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे.  दिलीप कुमार बऱ्याच कालावधीपासून आजारी होते. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर त्यांचे चाहते आणि सेलिब्रेटी श्रद्धांजली वाहत आहेत. दिलीप कुमार यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी बरेच सेलिब्रेटी गेले होते.

दिलीप कुमार यांना संध्याकाळी ५च्या सुमारास मुंबईतील जुहू येथील कब्रिस्तानमध्ये सुपुर्द-ए-खाक करण्यात आले. दिलीप कुमार यांच्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. पाणावलेल्या डोळ्यांनी सायरा बानो यांनी अखेरचा निरोप दिला.

अमिताभ बच्चन त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांच्यासोबत दिलीप कुमार यांच्या अंतिम दर्शनासाठी कब्रिस्तानमध्ये गेले होते. अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी बाहेर लोकांनी गर्दी केली होती. अमिताभ बच्चन यांनी दिलीप कुमार यांच्या निधनानंतर त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजलीदेखील दिली होती.

दिलीप कुमार यांचे बऱ्याच कलाकारांनी त्यांच्या घरी जाऊन अंतिम दर्शन घेतले. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, अभिनेते अनुपम खेर, शाहरूख खान, अभिनेते धर्मेंद्र, शबाना आझमी हे कलाकार दिलीप कुमार यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी गेले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिलीप कुमार यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांनी दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांचं सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही होते.

११ डिसेंबर, १९२२ साली पाकिस्तानमधील पेशावरमध्ये एका मुस्लीम कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव युसुफ खान होते. सिनेइंडस्ट्रीत पाऊल टाकले तेव्हा देविका राणी यांनी त्यांचे नाव बदलून दिलीप कुमार ठेवले. दिलीप कुमार यांनी त्यांच्या करिअरमध्ये ६२ सिनेमात काम केले. १९९८ मध्ये 'किला' हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता.

टॅग्स :दिलीप कुमारसायरा बानूअमिताभ बच्चनअभिषेक बच्चन