Join us  

ट्रॅजेडी क्विन मीना कुमारी यांची शोकगाथा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2017 9:33 AM

मीना कुमारी अभिनेत्री, लेखिका म्हणून जितक्या ओळखल्या गेल्या तितक्याच त्या ‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणूनही नावाजल्या. त्यांना ३९ वर्षाचे अल्पआयुष्य लाभले ...

मीना कुमारी अभिनेत्री, लेखिका म्हणून जितक्या ओळखल्या गेल्या तितक्याच त्या ‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणूनही नावाजल्या. त्यांना ३९ वर्षाचे अल्पआयुष्य लाभले असले तरी त्यांनी केलेला अभिनय, रचना आजही लोकांच्या मनात आहेत. दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी स्वत:ला दारूच्या नशेत गुंतवून घेतले. त्यातच त्यांचा अंत झाला.कमाल अमरोहीमीना कुमारी यांचे मुळ नाव महजबीन बानो असे होते. लहानपणापासून त्यांनी चित्रपटात काम करण्यास सुरूवात केली. तमाशा चित्रपटाच्या सेटवर अशोक कुमार यांनी दिग्दर्शक कमाल अमरोही यांची मीना कुमारी यांची भेट घडवून आणली. त्यानंतर कमाल अमरोही यांनी अनारकली चित्रपटात मीना कुमारी यांना प्रमुख भूमिकेत घेतले. महाबळेश्वरहून परत येत असताना मीना कुमारी यांच्या गाडीचा अपघात झाला. यात त्यांच्या हाताला लागले. पुण्यातील ससून रुग्णालयात कमाल अमरोही हे त्यांना नेहमी भेटायला जात असत. मीना कुमारी यांनी विचारले की, माझ्या हाताला लागल्यानंतरही तुम्ही मला चित्रपटात ठेवणार का? त्यावर कमाल यांनी पेन काढून मीना कुमारी यांच्या हातावर लिहिले,  ‘अनारकली मेरी’. मीना कुमारी यांच्या हाताच्या जखमा दुरुस्त झालेल्या नसल्याने शूटिंग दरम्यान त्यांचा डावा हात नेहमी दुपट्टा किंवा साडीने झाकलेला असायचा. १४ फेब्रुवारी १९५२ साली या दोघांनी लग्न केले. त्यावेळी मीना कुमारी १९ वर्षांच्या होत्या तर कमाल अमरोही हे ३४ वर्षांचे. कमाल यांचे लग्न झालेले होते आणि त्यांना तीन मुले होती. त्यामुळे हे लग्न अत्यंत गुप्त ठेवण्यात आले होते. मीना कुमारी यांचे वडील अली बक्ष यांना समजल्यावर ते रागाला गेले आणि त्यांनी तातडीने घटस्फोट घेण्याविषयी फर्मावले. १९५३ साली या दोघांच्या प्रेमप्रकरणावर कमाल यांनी दायरा नावाचा चित्रपट काढला. मीना कुमारी यांनी या चित्रपटात काम करण्याविषयी वडिलांना विचारल्यावर त्यांनी नकार दिला आणि अमर चित्रपटासाठी मेहबूब खान यांना तारखा दिल्याचे सांगितले. पाच दिवस शूटिंग केल्यावर मीना कुमारी यांनी काम करण्यास नकार दिला. पती कमाल अमरोही यांच्या दायरा चित्रपटासाठी आपण बॉम्बे टॉकीजकडे जात असल्याचे वडील अली बक्ष यांना सांगितले. त्याचवेळी तिच्यासाठी आपल्या घराचे दरवाजे कायमचे बंद झाल्याचे मीना कुमारी यांच्या वडिलांनी सांगितले. मीना कुमारी या त्या दिवशी शूटिंग पूर्ण करून परत वडिलांच्या घरी आल्यावर वडिलांनी घराचे दरवाजे उघडण्यास नकार दिला. त्या परत माघारी फिरल्या आणि पती कमाल यांच्या सायन (शीव) येथील घरी गेल्या. यासंदर्भातील बातम्या त्या काळात जोरदार प्रसिद्ध झाल्या. कमाल आणि मीना कुमारी हे चार वर्षे त्यांच्या मुळ गावी म्हणजे अमरोहा येथे राहिले. या दोघांमध्ये खूप प्रेम होते. मीना या अमरोही यांना ‘चंदन’ तर अमरोही हे मीनाला ‘मंजू’ म्हणून बोलावत असत. कमाल यांनी तीन अटींवर मीना कुमारी यांना चित्रपटात काम करण्यासाठी परवानगी दिली होती. लग्नानंतर काही वर्षांनी या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. कोणत्याही भूमिका करू नको म्हणून कमाल हे मीना कुमारींना बजावू लागले. त्याशिवाय अपत्यावरून वाद झाले. कमाल यांच्या मते मीनाला मुल नको होते. त्यामुळे त्यांच्या कारकीर्दीवर परिणाम होईल अशी त्यांना भीती होती. मीना कुमारी यांना एकदा नर्गिस दत्त यांनी विचारले, तुला आई व्हावेसे वाटत नाही का? त्यावर मीना म्हणाल्या, कोणती महिला आई होऊ इच्छित नाही?साहिबी बिवी और गुलाम हा त्यांचा चित्रपट गाजला. बर्लिन फिल्म फेस्टीव्हलसाठी हा चित्रपट गेला. त्यावेळी मीना कुमारी आणि कमाल अमरोही यांना दोन तिकीटे देण्याविषयी विचारणा करण्यात आली होती. त्यावर कमाल यांनी मी मीना कुमारीचा पती म्हणून येणार नसल्याचे सांगितले. इरॉस सिनेमाच्या एका शोमध्ये मीना कुमारी आणि कमाल अमरोही यांची महाराष्टÑाच्या राज्यपालांसमोर सोहराब मोदी यांनी ओळख करून दिली. ‘या मीना कुमारी आणि हे त्यांचे पती कमाल अमरोही.’ त्यावर कमाल म्हणाले, नाही, मी कमाल अमरोही आणि या माझ्या पत्नी अभिनेत्री मीना कुमारी’  असे म्हणत कमाल यांनी चित्रपटगृह सोडले. मीना कुमारी यांनी एकटीने हा प्रिमीअर पाहिला. ५ मार्च १९६४ रोजी त्यांनी सांगितले की, मी कमाल यांच्या घरी येणार नाही आणि त्यांनी तो शब्द खरा करून दाखविला. त्यावेळी मीना या त्यांच्या भगिनी आणि अभिनेते मेहमूद यांच्या पत्नी महलिका यांच्या घरी राहत. या घरी कमाल आले आणि त्यांनी सांगितले, मी मंजूला आता कधीही घेऊन जाणार नाही’.धर्मेंद्रवेगळे झाल्यानंतर मीना कुमारी आणि धर्मेंद्र यांची भेट झाली. त्यावेळी धर्मेंद्र हे साधे कलाकार होते. मीना कुमारी यांनी धर्मेंद्रसाठी खूप मदत केली. धर्मेंद्र यांनीही वारंवार या गोष्टीची आठवण करून दिली. घटस्फोटानंतर मीना कुमारी यांना दारू पिण्याची सवय लागली होती. मीना कुमारी आणि धर्मेंद्र हे तीन वर्षे एकत्र राहत होते. धर्मेंद्र हे देखील खूप दारू प्यायचे. एकदा विमानतळावर धर्मेंद्र यांना थांबविण्यात आल्यावर ते म्हणाले, मला जाऊ द्या, मीना माझी वाट पाहत असेल. त्यानंतर एका क्षणी मीना कुमारी यांच्यासोबत गाडीत न येता दुसºया गाडीने धर्मेंद्र निघून गेले. मीना कुमारी यांनी गाडी थांबवून भर रस्त्यात माझा धरम कुठे गेला असे जोराने ओरडण्यास सुरूवात केली.मीना कुमारी या प्रचंड दारू प्यायला लागल्या. त्यातच त्या आजारी पडल्या. उपचारासाठी त्या परदेशात गेल्या. त्यांनी कविताही खूप लिहिल्या. ३१ मार्च १९७२ रोजी त्यांचे निधन झाले.