डॉ. श्रीराम लागू यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्ये यादगार भूमिका साकारल्या. त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले, त्यापैकी एक मोठा आघात म्हणजे त्यांचा मुलगा तन्वीरचे अपघाती निधन. मुलाच्या मृत्यूचा आघात ते अखेरपर्यंत विसरू शकले नाहीत. होय, मुलाच्या अपघाती निधनाने श्रीराम लागू यांच्यातील हळवा पिता कोलमडून पडला होता. त्यांच्या मुलाचे नाव तन्वीर होते. तन्वीर मुंबई-पुणे ट्रेनने प्रवास करत होता.
त्यावेळी झोपडपट्टीतील एका मुलाने ट्रेनवर दगड मारला आणि तो दगड थेट तन्वीरला लागला. हा आघात इतका जबर होता की, तन्वीरचे यातच निधन झाले. ही घटना 1994 सालची. मुलाच्या निधनाने श्रीराम लागू अक्षरश: आतून उन्मळून पडले होते. त्याच्या स्मरणार्थ 2004 पासून श्रीराम लागू आणि त्यांच्या पत्नीने ज्येष्ठ रंगकर्मींसाठी ‘तन्वीर सन्मान’ हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली.
डॉ. श्रीराम लागू यांनी 1969 साली वसंत कानेटकर लिखित ‘इथे ओशाळला मृत्यु’ या नाटकातून अभिनय कारकीर्दीला प्रारंभ केला. त्यानंतर अनेक नाटकांमधून आणि सिनेमांतून त्यांनी स्वत:च्या अभिनयाचा ठसा उमटवला.