सध्या 'KGF 2' चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील विक्रमाची सगळीकडे कौतुक होत आहे. दरम्यान केजीएफच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी समोर येत आहे. केजीएफ २ मधील अभिनेता मोहन जुनेजा (Mohan Juneja) यांचे दीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले आहे. मोहन जुनेजा यांनी ७ मे रोजी बंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला. KGF 2 मध्ये, मोहन यांनी नागराजूची भूमिका साकारली होती. मोहन जुनेजा यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अभिनेते आणि कॉमेडियन मोहन जुनेजा यांच्या निधनामुळे साउथ सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.
मोहन जुनेजा यांनी 'KGF 2' चित्रपटात नागराजूची भूमिका केली होती, जो पत्रकार आनंद इंगलागीचे खबरी असतो. 'KGF 1' या चित्रपटातही त्यांनी काम केले होते. या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली आहे.
मोहन जुनेजा यांनी कॉमेडियन म्हणून करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यांनी तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषेतील १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मोहन जुनेजा यांना 'चेतला' चित्रपटातून मोठा ब्रेक मिळाला. या चित्रपटातील त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.