Join us

विकी कौशलच्या बहुप्रतीक्षित चित्रपट 'सरदार उधम'चा ट्रेलर झाला रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 5:13 PM

विकी कौशलचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'सरदार उधम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विकी कौशलचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'सरदार उधम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. रॉनी लाहिरी आणि शील कुमार यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शुजित सरकार यांनी केले आहे.  विकी कौशलने सरदार उधम सिंग यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये शॉन स्कॉट, स्टिफेन हॉगन, बानिता संधू आणि क्रिस्टी ऍव्हर्टन यांच्या महत्वापूर्ण भूमिका असून अमोल पराशर एका विशेष भूमिकेमध्ये असणार आहे. १६ ऑक्टोबरला सरदार उधम रिलीज होणार आहे.

ट्रेलरमध्ये सरदार उधम सिंगच्या जीवनाची झलक पहायला मिळते. विकी कौशल यात आधी कधीही न दिसलेल्या नव्या अवतारात दिसला आहे. या कधीही न सांगितल्या गेलेल्या गाथेमध्ये अज्ञात राहिलेल्या एका नायकाचे आपल्या इतिहासामध्ये खोलवर दडून राहिलेले अजरामर शौर्य, धैर्य आणि निर्भीडपणाची अनुभूती येते. १९१९च्या जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये निघृणपणे मारल्या गेलेल्या प्रियजनांच्या मृत्यूचा सूड घेणाऱ्या सरदार उधम सिंग यांच्या निश्चल धेय्यावर हा चित्रपट आधारित आहे.

याबद्दल विकी कौशल म्हणाला की, "सरदार उधम सिंहच्या कथेने मी मंत्रमुग्ध आणि प्रेरित झालो जी दृढता, वेदना महत्वाकांक्षा, अभूतपूर्व धाडस आणि बलिदानाचे प्रतिनिधीत्व करते. यापैकी बऱ्याच पैलूंना मी चित्रपटातली माझी भूमिका साकारताना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. उधम सिंग साकारताना आणि अभूतपूर्व वीरता व दृढता असलेल्या व्यक्तीच्या गाथेत प्राण फुंकताना बरीच शारीरिक आणि खरे सांगायचे तर त्याहून जास्त मानसिक तयारी करावी लागली." 

"मला या चित्रपटाच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात गूढ असे पान सर्वांसमोर आणण्याची संधी मिळाली. या गोष्टीला भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात सांगणे गरजेचे आहे आणि मला आनंद आहे की अमेझॉन प्राईम व्हिडिओसोबत सरदार उधम सर्व भौगोलिक सीमा पार करत आपल्या इतिहासाला जगभरात घेऊन जाणार आहे", असे त्याने पुढे सांगितले.

सरदार उधम माझ्यासाठी केवळ एक चित्रपट नसून ते एक साकार झालेले स्वप्न आहे. भारतातल्या सर्वात अमानुष शोकांकिकेचा सूड घेण्यासाठी आपल्या आयुष्याचे बलिदान देणाऱ्या या हुतात्म्याच्या आजवर मूक असलेल्या कथेला जगासमोर आणण्यासाठी अतिशय सखोल संशोधन करावे लागले." असे चित्रपटाचे दिग्दर्शक शुजित सरकार त्यांच्या सरदार उधमचे दिग्दर्शन करण्याच्या अनुभवाचे कथन करताना म्हणाले. 

टॅग्स :विकी कौशल