Join us

Trolling : प्रियंका चोपडा पुन्हा एकदा नेटिझन्सच्या रोषाला पडली बळी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2017 3:37 PM

देसी गर्ल प्रियंका चोपडा सध्या चांगलीच अडचणीत सापडताना बघावयास मिळत आहे. दोन दिवसांपूर्वीच बर्लिन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ...

देसी गर्ल प्रियंका चोपडा सध्या चांगलीच अडचणीत सापडताना बघावयास मिळत आहे. दोन दिवसांपूर्वीच बर्लिन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेताना तिने परिधान केलेल्या ड्रेसवरून सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा ती नेटिझन्सच्या रडारवर सापडली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर चौफेर टीका केली जात आहे. यावेळेस ती कपड्यांमुळे नव्हे तर होलोकॉस्ट मेमोरियलदरम्यान तिने घेतलेल्या एका सेल्फीवरून ती वादात सापडली आहे. सध्या प्रियंका बर्लिन येथे तिच्या आगामी ‘बेवॉच’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. यावेळी प्रियंका आणि तिचा भाऊ सिद्धार्थ होलोकॉस्ट मेमोरियल बघायला गेले होते. याठिकाणी या दोघांनी एक सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा सेल्फी पोस्ट होताच, नेटिझन्सनी प्रियंकावर चौफेर टीका करण्यास सुरुवात केली. ट्विटरवर तर नेटिझन्सचा संताप बघण्यासारखा होता. प्रियंकावरील नेटिझन्सचा राग अनावर झाल्याचे बघावयास मिळत होते. जेव्हा ही बाब तिच्या लक्षात आली तेव्हा तिने हे फोटोज् काढून टाकले.   आता तुम्ही म्हणाल की, भावासोबतची सेल्फी पोस्ट केल्याने ट्रोल करण्याचे कारण काय? तर यामागचे मुख्य कारण असे की, होलोकॉस्ट मेमोरियल ६० लाख यहूदिंच्या स्मरणार्थ बनविलेले मेमोरियल आहे. ज्यांची हिटलरच्या राज्यकाळात हत्या करून याठिकाणी दफन करण्यात आले होते. स्थानिक लोक जेव्हा याठिकाणी येतात तेव्हा खूपच भावुक होत असतात. मात्र प्रियंकाने याठिकाणी सेल्फी घेऊन लोकांचा राग ओढवून घेतला. सेल्फी पोस्ट करताना प्रियंकाने लिहिले की, ‘मी याठिकाणी टूरिस्ट म्हणून आली आहे. हे ठिकाण खूपच शांत आहे.’ प्रियंकाने हा सेल्फी पोस्ट करताच लोकांनी तिचा असा काही समाचार घेतला की, तिला ती पोस्ट डिलीट करावी लागली. दोन दिवसांपूर्वीच प्रियंका पंतप्रधान मोदी यांना भेटली असता, तिने परिधान केलेल्या ड्रेसवरून ती वादाच्या भोवºयात सापडली होती. लोकांनी तिच्यावर खरपूस टीका केली होती. मात्र प्रियंकानेही टीकाकारांना उत्तर देताना आईसोबतचा एक हॉट फोटो शेअर केला होता. मात्र यावेळेस तिने कुठल्याही प्रकारचे उत्तर दिले नाही.