आजच्या जमान्यातील चार बेधडक मुलींची बेधडक गोष्ट 'वीरे दी वेडिंग' या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. या चित्रपटात सोनम कपूर, करिना कपूर, शिखा तलसानिया आणि स्वरा भास्कर यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटातील एका दृश्याने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती. अभिनेत्री स्वरा भास्कर हस्तमैथुन करत असल्याचे या चित्रपटातील दृश्य पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. हे दृश्य काही तरुण-तरुणींच्याही पचनी पडले नव्हते आणि त्यावरून स्वराला अत्यंत वाईट्ट पद्धतीने ट्रोल करण्यात आले होते. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता काही महिने झाले आहेत. पण आता निवडणुकीच्या धामधुमीत स्वराच्या या दृश्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. कारण या दृश्यावरून तिला पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आले आहे.
काल लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान झाले. या मतदानाच्या दरम्यान काही मुलांनी आणि मुलींनी हातात घेतलेले पोस्टर सोशल मीडियावरील नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत आहेत. या पोस्टरवर लिहिण्यात आले होते की, या निवडणुकीत स्वरा भास्कर बनू नका, तुमच्या बोटाचा योग्य वापर करून मतदान करा. पण या पोस्टरचे काही समर्थन करत आहेत तर काहींच्या मते या पोस्टरद्वारे लोकांची स्त्रियांबद्दलची मनोवृत्ती अजूनही बदलली नाही हे दाखवून दिले जात आहे.
स्वरा भास्करने लोकसभेचे उमेदवार कन्हैय्या कुमार यांचा काही दिवसांपूर्वी प्रचार केला होता. त्याचमुळे तिला निवडणुकीच्या दरम्यान ट्रोल करण्यात आले असल्याचा अंदाज लावला जात आहे आणि स्वराला ट्रोल करणाऱ्या लोकांच्या ट्विटर हँडलच्या पुढे चौकीदार असे लिहिले असल्याने हे लोक भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देणारे आहेत हे कळून येत आहे.
पण या ट्रोलला देखील स्वराने सडेतोड उत्तर दिले आहे. तिने या ट्वीटला रिप्लाय देताना म्हटले आहे की, मला ट्रोल करण्यात येत असले तरी त्याचा उपयोगच होणार आहे. बाहेर ऊन खूप आहे तरीही तुम्ही उन्हात उभे राहून माझ्या नावाला प्रसिद्धी देत आहात याबद्दल धन्यवाद. काही लोक हे खूप संकुचित वृत्तीचे असतात. पण तुम्ही जे काम करत आहात ते मला नक्कीच आवडले. तसेच तिने दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मी दिल्लीत मे महिन्यात मतदान करणार आहे. पण आज जे लोक मतदान करत आहेत, ते आपली जबाबदारी काय आहे हे समजून नक्कीच मतदान करतील.