पहिल्याच चित्रपटानंतर स्टार झालेल्या आणि यानंतर अचानक गायब झालेल्या अनेक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये आहेत. ट्युलिप जोशी त्यापैकीच एक. ती आली, एका रात्रीत स्टार झाली आणि आली तशी अचानक बॉलिवूडमधून गायब झाली. २००२ साली प्रदर्शित झालेल्या ‘मेरे यार की शादी है’ चित्रपटात झळकलेली अभिनेत्री ट्युलिप जोशी तुम्हाला आठवत असेल ना. ट्युलिपनं या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटामुळे ती एका रात्रीत प्रकाशझोतात आली.
‘मेरे यार की शादी है’ या चित्रपटात काम करण्याची संधी ट्युलिप ला योगायोगानं मिळाली होती.चित्रपट निर्माता आदित्य चोप्रा त्याच्या मित्राच्या लग्नात गेला होता. तिथे त्याने ट्युलिपला पाहिलं आणि तिथेच त्याने तिला ‘मेरे यार की शादी है’साठी ऑडिशन देण्याची ऑफर केली. त्यावेळी ट्युलिपला हिंदी तितकं नीट येत नव्हते. त्यानंतर तिने हिंदीचे धडे गिरविले आणि चित्रपटात काम केलं. ट्युलिपचा पहिला चित्रपट हिट झाला. शाहिद कपूरसोबत ‘दिल मांगे मोर’ या चित्रपटातही ती झळकली.
ट्युलिपने अनेक चित्रपटांत काम केलं त्यातील एक चित्रपट होता मातृभूमि. हा चित्रपट स्त्री भ्रूण हत्यावर आधारीत होता. या चित्रपटात ट्युलिप ने कल्कीची भूमिका साकारली होती. जी पाच भावांसोबत लग्न करते आणि तिला आठवड्यातील रात्र वेगवेगळ्या भावांसोबत व्यतित करायची असते. तिचा हा चित्रपट चांगलाच वादात सापडला होता. ट्युलिपने हिंदीसोबत तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम चित्रपटांतही काम केलं. पण यानंतरचे सिनेमे फार काही कमाल दाखवू शकले नाही. त्यामुळे ट्युलिपने टीव्हीकडे मोर्चा वळवला. एअरलाइन्स या मालिकेत ती दिसली. याच दरम्यान ट्युलिपला कॅप्टन विनोद नायरवर प्रेम जडलं. प्रसिद्ध कादंबरी ‘प्राइड ऑफ लॉयन्स’चे लेखक असलेले विनोद नायर हे यशस्वी बिझनेसमॅनदेखील आहे.
विनोद 1989 पासून 1995 पर्यंत भारतीय लष्करात होते. ट्युलिप व विनोद 4 वर्षे लिव इन रिलेशीपमध्ये राहिल. त्यानंतर त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर ट्युलिप नवरा विनोद नायरसोबत त्यांचा 600 कोटींचा बिझनेस सांभाळते आहे. ती कंपनीची डायरेक्टर आहे. बिजनेसवूमन असण्यासह ती ज्योतिषीदेखील आहे. तिची स्वत:ची वेबसाइट आहे. ती लोकांना ज्योतिषसंबंधी माहिती देत, सल्लेही देते.