एक काळ असा होता ज्यात 'तुम तो ठहरे परदेसी' हे गाणं तुफान गाजलं होतं. आजही बऱ्याचदा अनेक जण हे गाणं गुणगुणताना पाहायला मिळतात. अल्ताफ राजा यांनी गायलेल्या या गाण्याने त्याकाळी बरेच रेकॉर्ड मोडले होते. विशेष म्हणजे याच गाण्यामुळे अल्ताफ राजा ( altaf raja) रातोरात सुपरस्टार झाले होते. या गाण्यानंतर त्यांनी अनेक म्युझिक अल्बमसाठी आपला आवाज दिला. मात्र, गेल्या काही काळात त्यांचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. इतकंच नाही तर सध्या ते किरकोळ गरजांसाठीही संघर्ष करत असल्याचं सांगण्यात येतं.
आपल्याला संगीत क्षेत्राचा मोठा वारसा मिळाला आहे. त्यामुळे आजवर अनेक प्रकारच्या गाण्यांचा आस्वाद घेण्याची संधी श्रोत्यांना मिळाली. यातलाच एक प्रकार म्हणजे गझल. असंख्य असे गझलकार आहेत ज्यांनी गझल घराघरात पोहोचवली. त्यातलंच एक नाव म्हणजे अल्ताफ राजा. ९० च्या दशकात अल्ताफ राजा यांनी अनेक गझल आणि गाण्यांच्या माध्यमातून श्रोत्यांची मनं जिंकली. परंतु, आज तेच अल्ताफ राजा कलाविश्वापासून दूर गेल्याचं पाहायला मिळतं.
'तुम तो ठहरे परदेसी', 'इश्क', 'प्यार का मजा लीजिए' अशी कितीतरी गाणी त्यांनी सुपरहिट केली. त्याकाळी अल्ताफ राजा प्रसिद्धीच्या शिखरावर होते. मात्र, आज त्यांचा वाईट काळ सुरु असल्याचं सांगण्यात येतं.
दरम्यान, अल्ताफ राजा यांचा पूर्वीप्रमाणे स्टारडम राहिलेला नाही. आता त्यांच्या लोकप्रियतेत घट झाल्याचं पाहायला मिळते. २०१५ मध्ये बम गोला या नावाने त्यांचा एक म्युझिक अल्बम आला होता. तसंच त्यांनी तमाशा चित्रपटासाठीही आवाज दिला होता. परंतु, या दोघांचीही जादू प्रेक्षकांवर चालली नाही. त्यामुळे सध्या ते काही इव्हेंटमध्ये गाण्याचे शो करत असल्याचं सांगण्यात येतं.