'तुंबाड' हा गाजलेला हिंदी सिनेमा पुन्हा रिलीज झालाय. २०१८ साली प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा हा सिनेमा १३ सप्टेंबरला संपूर्ण भारतात पुन्हा रिलीज झालाय. 'तुंबाड' पुन्हा रिलीज होताच सिनेमाने अनपेक्षितरित्या प्रेक्षकांचं हाऊसफुल्ल प्रेम मिळवलंय. जवळपास ८० % थिएटर हाऊसफुल्ल आहेत. अशातच सिनेमाचा निर्माता आणि प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता सोहम शाहने सिनेमाविषयी एक रंजक खुलासा केलाय. सिनेमात तुंबाडमध्ये जी भयानक आजी राहते, तिची भूमिका कोणी साकारली याविषयी सोहम शाहने खुलासा केलाय.
अभिनेत्री नाही तर या अभिनेत्याने साकारली होती आजीची भूमिका
सोहम शाह यांनी नुकत्याच एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला की, सिनेमात ज्या बालकलाकाराने विनायकचा मुलगा पांडुरंग ही भूमिका साकारली होती, त्याच बालकलाकाराने वाड्यातील शापित आजीची भूमिका साकारली होती. मोहम्मद समद असं या बालकलाकाराचं नाव आहे. मोहम्मदने सिनेमात अशा दुहेरी भूमिका साकारल्या आहेत, ज्याविषयी अनेकांना माहित नाही. सोहम शाहने प्रत्येक मुलाखतीत या बालकलाकाराचं कौतुक केलंय.
'तुंबाड २' लवकरच
'तुंबाड' सिनेमा १३ सप्टेंबरला भारतात पुन्हा रिलीज झालाय. गणेशोत्सवाचे दिवस असूनही सिनेमा पाहायला लोकांनी गर्दी केलेली दिसली. सिनेमाने तीन दिवसात बॉक्स ऑफिसवर ७ कोटींहून जास्त कमाई केलीय. 'तुंबाड' रिलीज झालेल्या प्रेक्षकांना एक मोठं सरप्राइज मिळालं ते म्हणजे 'तुंबाड २'चं. 'तुंबाड' सिनेमा सुरु होण्याआधी 'तुंबाड २'ची घोषणा करणारा व्हिडीओ दाखवण्यात आला. त्यामुळे प्रेक्षकांना चांगलाच आनंद झाला आहे.