हिंदी चित्रपटसृष्टीत प्रत्येकालाच हिमालयाएवढं यश किंवा लोकप्रियता मिळत असे नाही. मोजक्या कलाकारांनाच ते कसब उत्तमरित्या जमतं. ते बराच काळ रसिकांच्या गळ्यातले ताईत बनून राहतात. मात्र काही कलाकार चित्रपटसृष्टीत कधी येतात आणि कधी जातात तेही कळत नाही. काहींना सुरूवातीच्या काळात यश मिळतं, नंतर मात्र ते कुठे जातात हे कळत नाही. असाच एक अभिनेता म्हणजे नकूल कपूर. जितक्या लवकर नकूलला पसंती मिळाली तितक्या लवकरच त्याच्या वाट्याला अपयश आले.
१९९८ साली प्रदर्शित झालेल्या 'हो गई मोहब्बत तुमसे' अल्बमुळे तो प्रकाशझोतात आला होता. याच अल्बमुळे नकुलला 'आजा मेरे यार' हा पहिला हिंदी सिनेमा मिळाला. त्यानंतर 'तुमसे अच्छा कौन है' सिनेमातून त्याला अधिक पसंती मिळाली. दुस-याच सिनेमातून नकुलला अमाप लोकप्रियता मिळाली. इतकेच काय तर बॉलिवूडचा चॉकलेट हिरो म्हणून तो ओळखला जाऊ लागला. त्यानंतर नकुलच्या वाट्याला सिनेमाच्या ऑफर्स आल्या नाहीत.
बॉलिवूडवर किती दिवस अवलंबून राहणार म्हणून त्याने कामासाठी दुसरा पर्याय निवडला. कॅनडामध्ये तो स्थायिक झाला आणि तिथेच 'डीवाईन लाईट' नावाने योगा सेंटर त्याने सुरु केले. नकुलने करिअर सुरु केले तेव्हा सोशल मीडियाचा इतका गाजावाचा नव्हता. त्याकाळात चाहते पत्र पाठवून त्यांचे प्रेम व्यक्त करायचे. मात्र जेव्हा सिनेमात तो झळकला नाही. तेव्हा चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्याविषयी माहिती शोधायला सुरुवात केली.
मात्र इंटरनेटवरही त्याच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नव्हती. त्याचवेळी चाहत्यांनी मिळून इंटरनेटवर नकुलसाठी शोधमोहिमही सुरु केली होती. मात्र याचाही फारसा फायदा झाला नाही. एके दिवशी नकुल कपूरच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर वा-यासारखी पसरली. या बातमीबद्दल नकुलला कळताच त्याने सोशल मीडियावर तो सुखरुप असल्याचे सांगितले. मृत्यूची बातमी अफवा असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हाच तो पहिल्यांदा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसमोर आला होता. रुपेरी पडद्यावर नकुलची जादू चालली नसली तरी त्याच्या आयुष्यात मात्र समाधान वाटावे असे काम तो सध्या करत आहे.