Tun Tun death Anniversary : 1960 च्या दशकात अभिनेत्री टुनटुन या अभिनेत्रीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. विनोदी अभिनेत्री म्हणून ठसा उमटवणाऱ्या टुनटुन यांचा आज स्मृतीदिवस. 2003 साली आजच्या दिवशी (24 नोव्हेंबर) टुनटुन यांनी जगाचा निरोप घेतला होता. पण टुनटुन या नावाची जादू आजही कायम आहे.
टुनटुन यांचं खरं नाव उमा देवी होतं. 11 जुलै 1923 रोजी जन्मलेल्या टुनटुन अभिनेत्री म्हणून नावारूपास आल्या. पण प्रत्यक्षात त्यांना गायिका व्हायचं होतं.
बालपणी त्यांना बऱ्याच खस्ता खाव्या लागल्या. आईबापाविना वाढलेल्या या पोरीला फक्त नातेवाईकांचाच तो आधार होता. उमा देवी तीन वर्षांच्या असताना त्यांच्या आईवडिलांची जमिनीच्या वादातून हत्या झाली. त्यामुळे काकांनी टुनटुन यांचा सांभाळ गेला. अर्थात यादरम्यान त्यांना अनेक प्रकारचा अपमान गिळावा लागला. पण 13 वर्षांच्या वयात उमा देवींनी यांनी संधी साधली अन् त्या घरातून पळाल्या. पोहोचल्या त्या थेट मायानगरीत.
टुनटुन यांचं खरं नाव उमा देवी खत्री. त्यांचा जन्म युपीमधल्या एका गावात झाला. तीन वर्षांच्या उमा देवी पोरक्या झाल्यात. आईवडिलांची हत्या झाली. भावाचा आधार होता, पण एकदिवस त्याचीही हत्या केली गेली. अशास्थितीत उमा देवींना काकाने आपल्या घरी आणलं. चार-पाच वर्षांच्या उमा देवींकडून घरातली सगळी काम करून घ्यायची आणि त्याबदल्यात तिला दोनवेळची भाकरी द्यायची, असं सगळं सुरू झालं. त्या दिवसांत उमा देवींनी प्रचंड छळ सहन केला. पण उमा देवीला संगीताची भयंकर आवड होती.
घरातली सगळी कामं करून ही लहानशी पोर रेडिओवर गाणी ऐकत असे. जमेल तसा रियाज करत असे. त्याच क्षणी लहानग्या उमा देवींनी गायिका होण्याचं स्वप्न रंगवलं होतं. पण हे स्वप्न साकारणं सोपं नव्हतं. अशात एक मैत्रिण मुंबईहून गावाला आली आणि उमा तिच्यासोबत मुंबईत पोहोचल्या.
मुंबईत आल्या आल्या त्या थेट पोहोचल्या त्या संगीत दिग्दर्शक नौशादजींच्या बंगल्यावर. ‘मी चांगली गाते. तुम्ही मला संधी दिली नाही तर मी समुद्रात उडी मारून जीव देईल’, असं त्यांनी थेट सांगून टाकलं. त्या चिमुरड्या पोरीची लाडीक ‘धमकी’ ऐकून नौशादजींनी तिची एक छोटीशी टेस्ट घेतली. उमा या टेस्टमध्ये पास झाली आणि तिला ‘दर्द’ या सिनेमातलं ‘अफसाना लिख रहीं हूं...’ हे गाणं मिळालं. या गाण्यानं सगळ्यांना वेड लावलं. यानंतर उमा देवींनी अनेक सिनेमांत गाणी गायली. अर्थात काही वर्षानंतर गाणी मिळेनासी झालीत आणि उमा देवींना पुन्हा चिंता सतावू लागली. यावेळीही नौशादजी त्यांच्या मदतीला धावून आले. तू अभिनय कर, असा सल्ला नौशाद यांनी त्यांना दिला. पण उमा देवींनी तिथेही अट ठेवलीच. दिलीप कुमार असतील त्याच चित्रपटात मी काम करेन, असं त्या म्हणाल्या.
1950 साली आलेल्या ‘बाबुल’ या चित्रपटातून उमा देवींचा अभिनय प्रवास सुरू झाला. अर्थात, दिलीप कुमार सोबत होतेच. दिलीप कुमार यांनीच उमा देवींना टुनटुन हे नाव दिलं. पुढे त्या याच नावाने ओळखल्या जाऊ लागल्या.टुनटुन यांनी त्याकाळच्या सगळ्या मोठ्या कलाकारांसोबत त्यांनी काम केलं. जवळपास 200 हून अधिक चित्रपट केलं. आज त्या आपल्यात नाहीत. पण त्यांचा अभिनय, सुरेल आवाज आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहे.