अंकिता लोखंडे ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. आज अंकिताला सर्वजण ओळखतात, पण काही वर्षांपूर्वी अंकितासाठी इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण करणे सोपे नव्हते. अंकिता लोखंडे हिने नुकताच एक मुलाखती दिलीये. या मुलाखतीमध्ये अंकिता लोखंडे ही मोठे खुलासे करताना दिसली आहे.
अंकिता लोखंडेनं बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना एक खास गोष्ट शेअर केली आहे. लहानपणापासूनच डायरी लिहिण्याची आवड असल्याचं तिनं सांगितलं. ती म्हणाली, 'मी तिसरी-चौथीत असताना डायरी लिहायचे. त्या डायरीत मी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, की मला अभिनेत्री व्हायचं आहे. चित्रपटात अभिनय करण्यासाठी मुंबईला जायचं आहे. ते स्वप्न माझ्यासोबत मोठं झालं आणि आज मी इथे आहे. आज जर मी डायरी लिहत असते त्यात काय-काय लिहलं असतं ठावूक नाही'.
यावेळी अंकितानं ट्रोलिंगवरही भाष्य केलं. ती म्हणाली, 'ट्रोलिंग कोण थांबवू शकेल? ट्रोलिंग होत राहतं. ज्यांना ट्रोल करायचं आहे ते करत राहतील. ज्यांना माझ्या कामाचं कौतुक करायचं आहे तेही करतील. मला वाटते की ट्रोलिंगपेक्षा कौतुक करणे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे. माझ्या कामाचं कौतुक करणाऱ्यांकडे मी अधिक लक्ष देऊ इच्छिते'.
१९ डिसेंबर १९८४ मध्ये इंदोरमध्ये जन्मलेली अंकिता मराठी कुटुंबातील आहे. अंकिताने पवित्र रिश्ता ही टीव्ही मालिका ते बॉलिवूड असा प्रवास केला आहे. कंगना राणौतसोबत ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून झलकारीबाईच्या रुपात रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. अंकिता अलिकडेच स्वातंत्र्यवीर सावरकर या सिनेमात झळकली होती. त्यानंतर, आता ती लवकरच संदिप सिंह यांच्या आम्रपाली या अपकमिंग वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. त्यामुळे सध्या चाहते तिच्या या सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत.