'पटियाला बेब्स' या गाजलेल्या टीव्ही मालिकेत झळकलेला अभिनेता अनिरुद्ध दवे (Aniruddh Dave) याचा 'कागज 2' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्याची चर्चा आहे. अनिरुद्धने अक्षय कुमार स्टारर बेल बॉटम या सिनेमातही काम केलं आहे.आजवर अनिरुद्धने अनेक मालिका, सिनेमांमध्ये काम करुन यश, प्रसिद्ध मिळवली. परंतु, २०२१ हे वर्ष त्याच्यासाठी प्रचंड कसोटीचं राहिलं. अनिरुद्धला कोरोनाची लागण झाली आणि त्याचं सगळं आयुष्य बदलून गेलं होतं. जवळपास ५७ दिवस तो मृत्यूशी लढा देत होता. नुकतीच त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने कोरोना काळात त्याने कसा मृत्यूशी संघर्ष केला हे सांगितलं.
अनिरुद्धने अलिकडेच 'दैनिक भास्कर'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने कोरोनामुळे त्याचं आयुष्य कसं बदलून गेलं हे सांगितलं. अनिरुद्ध भोपाळमध्ये शूट करत असताना त्याला कोरोनाची लागण झाली होती. या कोरोना काळात त्याची अवस्था इतकी बिकट झाली होती की त्यावेळी आपण जगणार नाही, असा समज त्याचा झाला होता. मात्र, या काळात त्याच्या कुटुंबियांनी त्याची प्रचंड साथ दिली.
"त्या काळात मी रुग्णालयात अॅडमीट होतो आणि दररोज लोकांना अखेरच्या घटका मोजतांना पाहात होतो. त्या सगळ्याचा परिणाम माझ्यावर होत होता. त्यावेळी मी स्वत: वर पुरेपूर कंट्रोल करायचा आणि पोटावर झोपायचा प्रयत्न करायचो. आजूबाजूचा प्रकार पाहून कोणातही क्षण माझा अखेरचा क्षण ठरु शकतो असं सतत मला वाटायचं. माझं आयुष्य एका लहान मुलासारखं झालं होतं. हाताकडे पाहावं तिकडे सगळीकडे इंजेक्शन दिले होते. मला डायपर घालावं लागत होतं. मी स्वत:हून काहीही करु शकत नव्हतो", असं अनिरुद्ध म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "हे माझं दुसरं आयुष्य आहे. आणि, यासाठी मी देवाचे मनोमन आभार मानतो. माझ्यावर उपचार करण्यासाठी माझ्या कुटुंबियांना लोकांकडे पैसे उधार मागावे लागले. या काळात इंडस्ट्रीतील लोकांनीही माझी खूप मदत केली."
दरम्यान, अनिरुद्धने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून आता तो पुन्हा कलाविश्वात सक्रीय झाला आहे. अनिरुद्धने २००८ मध्ये राजकुमार आर्यन या मालिकेतून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तेरे संग या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'शोरगुल', 'बेल बॉटम', 'छोरियां छोरों से कम नहीं होतीं', 'प्रणाम' आणि 'कागज 2' या सिनेमात त्याने काम केलं आहे. तसंच लवकरच तो सतीश कौशिक यांच्या चंदू चॅम्पियन या सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा १४ जून २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.