छोट्या पडद्यावर तुफान गाजत असलेला रिअॅलिटी शो म्हणजे इंडियन आयडॉल (indian idol). आतापर्यंत या शोचे अनेक पर्व पार पडले आहेत. विशेष म्हणजे या शोमुळे कलाविश्वाला अनेक दिग्गज गायकही मिळाले. परंतु, या शोमध्ये सहभागी झालेले असेही कलाकार आहेत. जे काही काळ प्रकाशझोतात आले आणि त्यानंतर अचानकपणे कलाविश्वातून दूर झाले. आज अशाच एका प्रसिद्ध गायकाविषयी आपण जाणून घेणार आहोत. जो 'इंडियन आयडॉल'चा विजेता ठरला. मात्र, वयाच्या २९ व्या वर्षीच त्याने जगाचा निरोप घेतला.
'इंडियन आयडॉल' या कार्यक्रमाचे आजवर १० पेक्षा जास्त पर्व पार पडले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत या पर्वातील प्रत्येक गोष्टींवर नेटकऱ्यांनी टीकास्त्र डागलं आहे. तर सुरुवातीचे पहिले ५ पर्व विशेष गाजले होते. यातील दुसऱ्या पर्वातील संदीप आचार्य आठवतोय का तुम्हाला? 'इंडियन आयडॉल' या शोच्या दुसऱ्या पर्वाचा तो विजेता ठरला होता. मात्र, स्पर्धकाने फार कमी काळ यश उपभोगलं. वयाच्या २९ व्या वर्षीच त्याने जगाचा निरोप घेतला.
'इंडियन आयडॉल'च्या दुसऱ्या पर्वात संदीप आचार्यने प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिला टक्कर दिली होती. या पर्वात नेहा तिसऱ्याच फेरीत बाहेर पडली होती. तर, संदीपने हे पर्व गाजवत विजेतेपदही पटकावलं. आपल्या आवाजाने अनेकांना वेड लावणाऱ्या या गायकाने अचानकपणे घेतलेल्या एक्झिटमुळे सगळ्यांच्याच मनाला चटका लागला.
'या' कारणामुळे झालं संदीपचं निधन
४ फेब्रुवारी १९८४ मध्ये बिकानेर येथे जन्म झालेल्या संदीपचा मृत्यू कावीळमुळे झाल्याचं सांगण्यात येतं. सूत्रांच्या माहितीनुसार, संदीपला कावीळ झाल्यामुळे त्याला गुरुग्राम येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु, प्रकृती दिवसेंदिवस खालावल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. 15 डिसेंबर 2013 रोजी 29 वर्षीय संदीपने या जगाचा निरोप घेतला.
इंडियन आयडॉल जिंकल्यानंतर केला होता मोठा करार
इंडियन आयडॉलचा दुसरा सीझन जिंकल्यानंतर संदीपने सोनी बीएमजीसोबत एक म्युझिक अल्बमसाठी एक कोटींचा करार केला होता. इतकंच नाही तर तो एका शोसाठी तब्बल2.5 ते 3 लाख रुपये मानधन घेत होता. विशेष म्हणजे एका वर्षात तो जवळपास 60 ते 65 शो करायचा. इतकंच नाही तर त्याने विदेशातही गाण्याचे कार्यक्रम केले होते. इंग्लंड, अमेरिका, दुबई, आफ्रिका, इंडोनेशिया आणि नेपाळसह अनेक देशांमध्ये परफॉर्म केलं होतं.