संपूर्ण देश कोरोना संकटाशी लढत असताना अभिनेता अक्षय कुमारने कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी 25 कोटी रूपयांची मदत जाहीर केली. याआधीही देशावर संकट आले त्या त्या वेळी अक्षयने मदतीचा हात पुढे केला आहे. आता कोरोनाच्या संकटावेळीही तो कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आला. अक्षयने दाखवलेल्या या उदारपणाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. सोशल मीडियावरही अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. अक्षयची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना ही सुद्धा अक्षयचे कौतुक करण्यात मागे नाही.ट्विंकलने एक पोस्ट लिहून पतीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
ट्विंकलने लिहिले...
‘या व्यक्तिचा मला कायम अभिमान वाटतो. तू खरंच एवढे पैसे दान करणार आहेस? असे मी त्याला विचारले तेव्हा त्याचे उत्तर ऐकून मला त्याचा अभिमान वाटला. जेव्हा मी सुरुवात केली होती त्यावेळी माझ्याकडे काहीही नव्हते, मी स्वत: काहीही नव्हतो. पण आज माझ्याकडे सर्वकाही आहे. अशा वेळी मी ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना काहीतरी देतांना मागे-पुढे का पाहावे? ज्यांच्याकडे आज काहीच नाही, त्यांना मी मदतीचा हात देतोय, असे अक्षय मला म्हणाला. त्याचे ते उत्तर ऐकून अभिमानाने माझा ऊर भरून आला,’ असे ट्विंकलने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.काल शनिवारी म्हणजे 28 मार्चला अक्षय कुमारने कोरोनाग्रस्तांसाठी 25 कोटी रूपयांची मदत जाहीर केली होती. ‘आज अशी वेळ आहे की आपल्या सर्वांचे आयुष्य धोक्यात आहे. कोणासाठी काहीतरी चांगले करण्याची हिच योग्य वेळ आहे. मी माझ्या बचतीतून 25 कोटी रुपये पंतप्रधान मदत निधीमध्ये दान करत आहे. चला जीव वाचवूया..., असे ट्वीट त्याने केले होते. त्याचे ट्वीट रिट्वीट करत पीएम मोदींनी त्याचे कौतुक केले होते.