बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड कनेक्शन याबाबत अनेकदा चर्चा होतच असतात. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींचे अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध असल्याचंही समोर आलं होतं. गँगस्टर दाऊदबरोबरही अनेक अभिनेत्रींची नावं जोडलं गेलं होतं. अक्षय कुमारची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नानेही दाऊदच्या पार्टीत डान्स केल्याचं वृत्त समोर आलं होतं. आता इतक्या वर्षांनंतर अभिनेत्रीने याबद्दल भाष्य केलं आहे.
ट्विंकल खन्नाने टाइम्स ऑफ इंडियासाठी लिहिलेल्या कॉलममध्ये दाऊदच्या वृत्ताबाबत अखेर मौन सोडलं आहे. "मी एका न्यूज चॅनेलवर माझ्या नावाचं टिकर पाहिलं. ज्यामध्ये असं म्हटलं होतं की मी दाऊदसाठी डान्स केला. त्याच्यासमोर मी अनेक गाण्यांवर वेड्यासारखी नाचले, असं त्यात म्हटलं गेलं होतं. माझा डान्स बघणं म्हणजे WWF ची मॅच बघण्यासारखं आहे. माझ्या मुलांनाही असंच वाटतं. पण, न्यूज चॅनेल वाल्यांना ही गोष्ट माहीत असायला हवी होती की दाऊदने माझ्यापेक्षा चांगल्या डान्सर्सची निवड केली असेल. पण, फेक न्यूजचं जग हे असंच आहे," असं ट्विंकल खन्नाने म्हटलं आहे.
दाऊदच्या पार्टीत ट्विंकलने डान्स केल्याच्या वृत्तावर अक्षयनेही एका मुलाखतीत भाष्य केलं होतं. ही अफवा असल्याचं त्याने म्हटलं होतं. "अशा बातम्या कुठून येतात, याबाबत मला कल्पना नाही. जर या गोष्टीत तथ्य असतं. तर माझ्या घरी आतापर्यंत धाड पडली असती. या बातमीनंतर माझ्या घरी एकही पोलीस अधिकारी आला नाही. या बातमीमुळे मी हैराण झालो होतो," असं अक्षय एका मुलाखतीत म्हणाला होता.