अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच घेतलेल्या मुलाखतची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या मुलाखतीत अक्षयने नरेंद्र मोदी यांना कोणतेही राजकीय प्रश्न न विचारता त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी प्रश्न विचारले आणि त्यांनी देखील दिलखुलासपणे या प्रश्नांना उत्तरं दिली. या मुलाखतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
अक्षयने ही मुलाखत खूपच चांगली घेतली असे काहींचे म्हणणे आहे तर काहींच्या मते या मुलाखतीद्वारे अक्षयने भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला आहे. या मुलाखतीमुळे अक्षयचे काहीजण कौतुक करत आहेत तर काहीजण त्याच्यावर टीका करत आहेत.
केवळ अक्षयच नव्हे तर त्याची पत्नी अभिनेत्री-लेखिका ट्विंकल खन्नाला देखील सोशल मीडियाद्वारे या मुलाखतीबाबत विचारले जात आहे. एवढेच नव्हे तर या मुलाखतीदरम्यान नरेंद्र मोदी यांना अक्षयने सोशल मीडियाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले होते की, मी सोशल मीडियावर काय सुरू आहे हे नक्कीच पाहातो. कारण यामुळे जगात काय सुरू आहे याची मला माहिती मिळते. मी तुमचे आणि ट्विंकल खन्ना यांचे देखील ट्वीट वाचतो. त्या माझ्यावर ज्याप्रमाणे राग व्यक्त करतात, त्यावरून तुमच्या घरात शांती नांदत असेल असे मला वाटते.
भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर नरेंद्र मोदी यांचे हे उत्तर ट्वीट करण्यात आले होते. या ट्वीटला उत्तर देताना ट्विंकलने म्हटले होते की, माझ्याबद्दल देशाच्या पंतप्रधानांना केवळ माहितीच नाहीये तर ते माझ्या कामाबाबत देखील वाचतात याकडे मी खूप सकारात्मकदृष्ट्या पाहाते. हे ट्वीट वाचल्यावर तिच्यावर अनेक टीका करण्यात आल्या होत्या. त्यावर तिने आता एक मजेशीर ट्वीट केले आहे. तिचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. या ट्वीटमध्ये तिने म्हटले आहे की, कोणाच्या ट्विटरवर मी प्रतिक्रिया देते याचा अर्थ मी कोणत्या पक्षाचा प्रचार करतेय असा होत नाही. मला जो पक्ष व्होडकाची पार्टी देईन आणि त्यामुळे मला दुसऱ्या दिवसापर्यंत हँगओव्हर राहील त्याच पक्षासोबत मी आहे.