Join us

ट्विंकल खन्नानेच उडवली तिच्या चित्रपटाची खिल्ली, वाचून तुम्हाला आवरणार नाही हसू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 12:28 PM

ट्विंकल तिच्या एका चित्रपटाची खिल्ली उडवताना दिसली आहे.

ठळक मुद्देट्विंकलने रिप्लाय केला आहे की, मेला (जत्रा) आरोग्यासाठी किती घातक असू शकतो याची मला चांगलीच जाणीव आहे.

ट्विंकल खन्नाने बरसात या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने बादशहा, मेला यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. राजेश खन्ना आणि डिम्पल कपाडिया यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांची ट्विंकल लेक असली तरी तिला अभिनयक्षेत्रात तिचे नाव कमावता आले नाही. ती एक अभिनेत्री म्हणून कधीच चांगली नव्हती असे तीच अनेकवेळा बोलताना दिसते. अनेकवेळा तर तिच्या अभिनय कौशल्याची खिल्लीदेखील उडवते. आता पुन्हा एकदा तिच्या एका चित्रपटाची खिल्ली उडवताना ती दिसली आहे.

ट्विंकल सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिच्या ट्वीटची तर नेहमीच चर्चा रंगते. तिने आता तिच्या ट्वीटद्वारे आमिर खान आणि तिची मुख्य भूमिका असलेल्या मेला या चित्रपटाची खिल्ली उडवली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरशः आपटला होता. या चित्रपटातील माझ्या भयानक अभिनयाची लोक आजही आठवण काढतात असे ट्विंकलने अनेकवेळा मस्करीत म्हटले आहे.

देशात सध्या कोरोनाने थैमान घातले असून सगळ्यांनीच याची धास्ती घेतली आहे. त्यामुळे लोकांनी एकत्र जमू नये, कोणत्याही धार्मिक कार्यात मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊ नये असे आवाहन सरकारतर्फे करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी एक ट्वीट केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की,  अयोद्धामधील राम नवमीची जत्रा कोरोनाच्या कारणास्तव यावेळी रद्द करावी... अनेकांच्या आरोग्याचा हा प्रश्न आहे. त्यावर ट्विंकल खन्नाने दिलेला रिप्लाय सगळ्याचे लक्ष वेधून घेत आहे. तिने रिप्लाय केला आहे की, मेला (जत्रा) आरोग्यासाठी किती घातक असू शकतो याची मला चांगलीच जाणीव आहे.

ट्विंकलने दिलेला हा रिप्लाय तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. तिच्या सेन्स ऑफ ह्युमरचे चांगलेच कौतुक सध्या सोशल मीडियावर होत आहे. ट्विंकल ही अभिनेत्री असली तरी तिने गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले आहे. ट्विंकलला अभिनेत्री म्हणून यश मिळवता आले नसले तरी तिने एक लेखिका म्हणून तिची आज एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ट्विंकलच्या मिसेस फनी बोन्स, द लिजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद आणि पायजमाज आर फॉरगिव्हन या पुस्तकांना वाचकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. आता ती तिच्या चौथ्या पुस्तकाच्या लिखाणात व्यग्र आहे.

टॅग्स :ट्विंकल खन्नाकोरोना वायरस बातम्या