कोरोना आणि लॉकडाऊनमुळे चित्रपटगृहे बंद असल्याने ओटीटी प्लॅटफॉर्मला सुगीचे दिवस आले आहेत. अनेक सिनेमे चित्रपटगृहांऐवजी ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. नेटफ्लिक्स इंडिया या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच एक तेलगू सिनेमा रिलीज करण्यात आला आणि हा सिनेमा पाहून लोकांचे माथे ठणकले. काहीच तासांत ट्विटरवर ‘बायकॉट नेटफ्लिक्स’ हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला.
नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या या सिनेमाचे नाव ‘कृष्णा अॅण्ड हिज लीला’ असे आहे. हा एक दाक्षिणात्य सिनेमा आहे. गेल्या 25 जूनला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि या सिनेमावरून नव्या वादाला तोंड फुटले. हा सिनेमा हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत, अनेकांनी असा सिनेमा प्रदर्शित केल्याबद्दल नेटफ्लिक्सला लक्ष्य केले.
‘कृष्णा अॅण्ड हिज लीला’ या सिनेमातील मुख्य पात्राचे नाव कृष्णा आहे. कृष्णाचे अनेक मुलींसोबत प्रेमसंबंध असल्याचे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. यापैकी एकीचे नाव राधा असल्याचेही दाखवले गेले आहे. हे पाहून नेटकरी भडकले. बायकॉट नेटफ्लिक्स हा हॅशटॅग बघता बघता ट्रेंड करू लागला. चित्रपटांत हिंदू धर्मातील देवांची नावे प्रमुख भूमिकांना देऊन निर्मात्यांनी हिंदू धर्माचा अपमान केला, असा आरोप अनेकांनी केला आहे.
काय आहे कथा‘कृष्णा अॅण्ड हिज लीला’मध्ये साऊथस्टार सिद्धू जोन्नलगड, अभिनेत्री सीरत कपूर, श्रद्धा श्रीनाथ, शालिनी वाडनिलकट्टा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिद्धूने यात कृष्णाची भूमिका साकारली आहे. कृष्णा हा दिसायला साधारण असलेला पण बोलण्यात पटाईत असलेला तरूण असतो. आपल्या बोलण्याने तरुणींवर प्रभाव पाडण्यात कृष्णा कायमच यशस्वी ठरतो. या कृष्णाचे अनेक मुलींबरोबर प्रेमसंबंध असतात. अनेक मुलींबरोबर कृष्णाचे शरीरसंबंध असल्याचेही चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या पैकी राधा, सत्या आणि रुक्सार या मुलींबरोबर कृष्णाचे नाते कसे असते अशी या सिनेमाची ढोबळ कथा आहे़