Join us  

अनुराधा पौडवालांच्या हस्ते त्यागराज खाडिलकर यांना 'स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार' प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2024 7:33 PM

अनुराधा पौडवालांच्या हस्ते त्यागराज खाडिलकर यांना 'स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला.

प्रसिद्ध गायक संगीतकार त्यागराज खाडिलकर यांचा "स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार"ने गौरव करण्यात आला आहे.  सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधाजी पौडवाल यांच्या हस्ते  खार येथील निवास्थानी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५१ हजार रोख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा सोहळा अनुराधा पौडवाल यांच्या निवास्थानी स्थित दक्षिणेश्वरी काली माता मंदिरात संपन्न झाला. आजचा हा २७ वा पुरस्कार सोहळा आहे. 

अनुराधा म्हणाल्या, 'अरुणजी हे स्वतः एक अतिशय उच्चकोटीचे संगीतकार - म्युझिशियन होते. त्यामुळे कलाकारांचा योग्य तो सन्मान व्हायला पाहिजे. बहुतेकवेळा त्यांचे फॅन्स काही सत्कार सोहळे करीत असतात. पण आर्टिस्टने एका आर्टिस्टचा सन्मान करणे याला जास्त महत्व आहे. आजचा हा २७वा सोहळा आहे. याच्या आधी ज्या ज्या कलाकारांनी अरुणजींसोबत काम केले आहे, ज्यांना त्यांच्या कामाची पद्धत, त्यांचा स्वभाव माहीत आहे अशा कलावंतांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे'.

त्यागराज खाडिलकर यांची पुरस्कारासाठी का निवड केली, याबद्दल अनुराधा पौडवाल म्हणाल्या, 'त्यागराज यांची निवड करण्यामागे विशेष कारण आहे. काही महिन्यापूर्वी मी त्यांच्या एका कार्यक्रमासाठी विशेष प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी दिव्यांग मुलांना घेऊन एक अल्बम केला होता. अशा मुलांसोबत केलेला हा जगातील एकमेव असा सुंदर अल्बम आहे, असं मला वाटतं. इतकं सुंदर संगीत आणि संयोजन करून त्यांनी पूर्ण न्याय दिला. दुसऱ्या आर्टिस्टला पुढे आणावं ही गोष्ट  फार महत्वाची आहे. त्यांच्यातील ही गोष्ट मनाला भिडली आणि म्हणूनच त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली'.

पुरस्कार मिळाल्यावर गायक संगीतकार त्यागराज खाडिलकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, 'माझ्यासाठी हा अत्यंत महत्वाचा पुरस्कार आहे. गेल्या २६ वर्षातील पुरस्कार्थींची यादी पाहिल्यावर खरंतर मी थरारून गेलो. अरुणजींच्या नावाचा हा पुरस्कार मिळविणाऱ्यांच्या या मांदियाळीमध्ये माझीही नोंद झाली, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अरुणजींंच्या नावाचा पुरस्कार लाभावा आणि तोही साक्षात पद्मश्री अनुराधाताई यांच्या हस्ते ही माझ्यासाठी विशेष भाग्याची आणि प्रेरणादाई गोष्ट आहे'.

 त्यागराज यांनी याप्रसंगी दिव्यांग गायकांच्या हिंदी अलब्मची, तसेच अनुराधा पौडवाल यांच्यासोबत 'भजनगंगा' या हिंदी कार्यक्रमाची घोषणा केली.   याचवेळी स्वरकुल ट्रस्टतर्फे सादर झालेल्या 'तिमीरातूनी तेजाकडे' या दिव्यांग कलाकारांनी गायलेल्या अल्बममधील दोन गायकांना अनुराधा यांच्या हस्ते प्रत्येकी ११ हजारा रुपयांची धनराशी देऊन सन्मानित करण्यात आलं. 

टॅग्स :अनुराधा पौडवालसेलिब्रिटीसंगीत