आपल्या गुणवान बाल गायकांच्या धमाकेदार आणि अविस्मरणीय गाण्यांनी गेली सात वर्षं रसिक प्रेक्षकांची मने काबीज केलेला ‘सारेगमपा लिटिल चॅम्प्स’ हा ‘झी टीव्ही’वरील रिअॅलिटी कार्यक्रम आता आपली आठवी आवृत्ती घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनला 1990 च्या दशकातील लोकप्रिय गायिका अलका याज्ञिक, पद्मभूषण उदित नारायण आणि पद्मश्री कुमार शानू परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. टीव्हीवरील नामवंत सूत्रसंचालक मनीष पॉल हा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे.
या कार्यक्रमाच्या आगामी भागात नामवंत संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांची गाजलेली गाणी ऐकायला मिळतील आणि संगीतकार प्यारेलाल शर्मा त्यांची पत्नी सुनीला शर्मासह या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी उदित नारायण यांनी पार्श्वगायनाच्या क्षेत्रात प्यारेलालजींमुळे त्यांना पहिली संधी कशी मिळाली, याचा किस्सा सांगितला.
तनिष्का सरकारने अतिशय अप्रतिमपणे गायलेल्या ‘डफलीवाले’ या गाण्यानंतर लगेचच उदित नारायण यांनी सांगितले की, एखादे तरी गाणे गाण्याची संधी मिळेल, या आशेने मी तब्बल दोन वर्षं दररोज प्यारेलालजींच्या घरी जात होतो. प्यारेलालजी हे माझ्या दृष्टीने संगीत क्षेत्राचे परमेश्वरच आहेत. माझी त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट घडेल, अशी मी कधी अपेक्षाच केली नव्हती. मी दोन वर्षं प्यारेलालजींच्या घरी गाणं गाण्याच्या आशेने जात असे. स्वत: कामात अतिशय व्यग्र असतानाही ते माझं स्वागत करत... तरीही मी त्यांच्याकडे दररोज का येतो, असं त्यांनी कधी विचारलं नाही. त्यांनी संगीत दिलेल्या ओम शांती ओम, डफलीवाले यांसारख्या गाण्यांचं ध्वनिमुद्रण माझ्यासमोरच झालं होतं. तेव्हा संगीताच्या या महासागरात आपण एक अगदी छोटा मासा आहोत, असं मला वाटत असे.”
पुढे उदित नारायण यांनी सांगितले की, “एके दिवशी रेकॉर्डिंग स्टुडिओत मी हिंमत करून प्यारेलालजींना म्हणालो, प्यारेलालजी, आज मी गायल्याशिवय इथून जाणार नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं, ठीक आहे. आज तुझं गाणं ऐकूया. तेव्हा मी त्यांना एक लोकगीत आणि आणखी एक लोकप्रिय गीत गाऊन दाखविलं. ते ऐकल्यावर ते म्हणले, या मुंबईनगरीत तुझेही दिवस येतील. त्यासाठी तू धीर धर... त्यानंतर त्यांनी मला अनेक संधी दिल्या. इतकंच नाही, तर लक्ष्मीकांतजींनीही माझ्यावर भरपूर प्रेम केलं. मी या दोघांचा अतिशय आभारी आहे.”