गतवर्षी मीटू मोहिमेने बॉलिवूड ढवळून निघाले. या मोहिमेअंतर्गत बॉलिवूडच्या अनेक महिलांनी त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाची प्रकरणे जगापुढे आणली. बॉलिवूडच्या अनेक दिग्गज पुरूषांवर या निमित्ताने लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेत. आता ‘उजडा चमन’ या चित्रपटाच्या अभिनेत्रीनेही आपली आपबीती सांगितली आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे, मानवी गगरू. ‘उजडा चमन’मध्ये ती सनी सिंगच्या अपोझिट दिसली होती. टीव्हीएफ ट्रिपलिंग आणि फॉर मोर शॉट्स यासारख्या वेब सीरिजमध्येही ती दिसली आहे. एका ताज्या मुलाखतीत मानवीने एक धक्कादायक खुलासा केला. होय, एका दिग्दर्शकाने ऑडिशनदरम्यान मला रेप सीन करून दाखवण्याची मागणी केली होती, असे तिने सांगितले.
‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मानवीला कास्टिंग काऊचबद्दल विचारण्यात आले. यावर तिने सांगितलेला अनुभव धक्कादायक होता. तिने सांगितले की, ‘माझ्यासोबत जे काही घडले त्याला सरसकट कास्टिंग काऊच म्हणता येणार नाही. पण ती गोष्ट मला आजही आठवते.
एकदा मी ऑडिशनसाठी गेले होते. तिथे दिग्दर्शकांनी मला चक्क रेप सीन करुन दाखविण्यास सांगितले होते. ऑडिशनसाठी गेले तेव्हा तिथे आधीच दोन पुरूष बसलेले होते. त्यांच्यासोबत रेप सीन करून दाखव, असे दिग्दर्शक मला म्हणाला. त्या दिग्दर्शकांचे ऑफिस विचित्र होतेच. शिवाय त्याच्या ऑफिसात एक बेडही होता. ते सगळे बघून मी प्रचंड घाबरले आणि अक्षरश: तिथून पळून आले.’
मानवी नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘उजडा चमन’ या चित्रपटामध्ये झळकली. या चित्रपटासाठी मानवीला 15 किलो वजन वाढवण्यास सांगण्यात आले होते. मानवीने यास स्पष्ट नकार दिला होता. अखेर बॉडी सूट घालून मानवीने या चित्रपटात काम केले. लवकरच ती आयुष्यमान खुरानासोबत ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटात झळकणार आहे.