सलमान खान बॉलिवूडचा सुपरस्टार आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. सर्वाधिक पैसा कमावणा-या सेलिब्रिटींच्या यादीत सलमानचे नाव आहे. पण कोट्यवधी रूपये कमावणा-या सलमानच्या डोक्यावरही कर्ज आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का. होय, भाईजान आजही या कर्जाची परतफेड करू शकलेला नाही. नुकत्याच पार पडलेल्या ‘उमंग 2020’ या सोहळ्यात खुद्द भाईजानने स्वत: याची माहिती दिली. त्याने सांगितलेला हा किस्सा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
त्याने सांगितले की,‘ एकदा माझी सायकल पंक्चर झाली होती. मी दुरुस्त करण्यासाठी एका मॅकॅनिकडे गेलो. मी शॉर्ट्स घालून बाहेर पडलो होतो. त्यामुळे माझ्या खिशात पैसे नव्हते. मी मॅकॅनिक काकांना तसे सांगितले आणि सायकल दुरूस्त करून द्या, मी नंतर पैसे देतो, अशी विनंती त्यांना केला. पण त्यावेळी ते मॅकॅनिक काका जे काही म्हणाले, ते ऐकून मला ओशाळल्यासारखे झाले. तू लहानपणीही असच करायचास. खूप वर्षांपूर्वी तू सायकल दुरुस्त करायला आला होतास. त्याचे पैसे तू आजपर्यंत दिले नाहीस, तुझ्याकडे आजही सव्वा रूपया उधार आहे, असे ते मला म्हणाले. काकांचे ते शब्द ऐकून मला कधी नव्हे इतके लाजीरवाणे वाटले.
त्यानंतर मात्र मी आठवणीने त्यांना पैसे द्यायला गेलो होतो मात्र त्या काकांनी पैसे घेण्यास नकार दिला. मला पैसे नकोत, असे ते मला म्हणाले.
सलमान खान सध्या आपल्या राधे: द मोस्ट वॉन्टेड भाई या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. हा चित्रपट ईद दिवशी रिलीज होईल.