Join us

उज्ज्वल निकम यांच्यावर बायोपिक येणार! नाव ठरले, पटकथाही तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2020 5:44 PM

दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी आज या बायोपिकची घोषणा केली.

ठळक मुद्देउज्ज्वल यांनी  आपल्या 30 वर्षाच्या करिअरमध्ये 628 आरोपींना जन्मठेप आणि 37 आरोपींना फाशीची शिक्षा मिळवून दिली आहे. 

बायोपिकची चलती असलेल्या सध्याच्या काळात आणखी एक बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. होय, अजमल कसाब सारख्या क्रूरकर्म्याला फासावर लटकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्यावरचा चरित्रपट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी आज याबाबतची घोषणा केली. उमेश शुक्ला यांनी याआधी ‘ओएमजी-ओह माय गॉड’,‘102 नॉट आऊट’ सारखे दमदार सिनेमे दिग्दर्शित केले आहेत.चित्रपटाची पटकथा तयार आहे. फक्त सिनेमाची स्टारकास्ट ठरायची आहे. त्यामुळे उज्ज्वल निकम यांची भूमिका पडद्यावर कोण जिवंत करणार, ही उत्सुकता ताणली गेली आहे.

उज्ज्वल निकम यांच्या या चरित्रपटाचे नाव ‘निकम’ असे असणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक भावेश मंडालिया आणि गौरव शुक्ला यांनी सिनेमाची पटकथा लिहिली आहे. येत्या नव्या वर्षात या सिनेमाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे.उज्ज्वल निकम यांनी दहशतवादी अजमल कसाब , कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरण,मोहसिन हत्या प्रकरण,प्रमोद महाजन हत्या प्रकरण हे खटले लढले आहेत. उज्ज्वल निकम यांना दहशतवादी प्रकरणातील मास्टर समजले जाते. निकम जो खटला हातात घेतात त्यातला एकही आरोपी सुटत नाही, असे निर्विवाद मानले जाते. उज्ज्वल यांनी  आपल्या 30 वर्षाच्या करिअरमध्ये 628 आरोपींना जन्मठेप आणि 37 आरोपींना फाशीची शिक्षा मिळवून दिली आहे.   निकम यांना अंडरवर्ल्ड आणि दहशतवाद्यांकडून धमकी मिळालेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे. अशी सुरक्षा मिळणारे निकम हे देशातील एकमेव वकील आहेत.  

म्हणून मी या चित्रपटासाठी तयार झालो-निकममाझ्यावर पुस्तक आणि चित्रपट तयार करण्यासाठी काही वर्षांपासून अनेकजण मागे लागले आहेत. यासाठी माझी बिलकूल इच्छा नव्हती. कारण माझ्यावर अनेक पीडित लोकांची मोठी जबाबदारी आहे. पण प्रतिभाशाली टीमसोबत भेट झाल्यावर मी या चित्रपटासाठी तयार झालो,असे विशेष सरकारी उज्ज्वल निकम यांनी सांगितले.

  

टॅग्स :उज्ज्वल निकमबॉलिवूड