Join us

विनोद खन्ना यांच्या आयुष्यातील न ऐकलेल्या घटना!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2017 8:51 AM

बॉलिवूडचे आॅल टाइम हॅण्डसम अभिनेता अशी ओळख मिळालेल्या विनोद खन्ना यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या बॉलिवूड करिअरचा ग्राफ ...

बॉलिवूडचे आॅल टाइम हॅण्डसम अभिनेता अशी ओळख मिळालेल्या विनोद खन्ना यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या बॉलिवूड करिअरचा ग्राफ खूपच रंजक असा राहिला आहे. त्यांच्या आयुष्यातील आतापर्यंतच्या घडामोडींविषयी या खास रिपोर्टमधून माहिती देत ‘सीएनएक्स मस्ती’कडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करीत आहोत. - विनोद खन्ना लहानपणी खूपच लाजाळू होते. शाळेत असताना एका टीचरने त्यांना बळजबरीने नाटकात काम करण्यास सांगितले होते. मात्र विनोद यांनी कौतुकास्पद असा अभिनय करून सर्वांनाच आपलेसे केले होते. - बोर्डिंगमध्ये असताना विनोद खन्ना यांनी ‘सोलवां साल’ आणि ‘मुगल-ए-आजम’ हे चित्रपट बघितले अन् त्याचवेळी त्यांनी अभिनयात करिअर करण्याचा पक्का निर्धार केला होता. - विनोद खन्ना यांच्या वडिलांना अभिनयाविषयी फारशी आवड नव्हती. त्यामुळे विनोद यांनी अभिनेता व्हावे, अशी त्यांची अजिबात इच्छा नव्हती. जेव्हा विनोदने त्यांना अभिनेता व्हायचे असल्याचे सांगितले होते, तेव्हा त्यांनी विनोदवर थेट बंदूक ताणली होती. मात्र विनोद त्यांच्या निर्णयावर ठाम होते. अखेर त्यांच्या वडिलांनीच दोन पावले मागे होत, आपल्या मुलाची इच्छा पूर्ण केली. - विनोद खन्ना यांची एका पार्टीत निर्माता आणि दिग्दर्शक सुनील दत्त यांच्याशी भेट झाली होती. त्यावेळी सुनील दत्त ‘मन का मीत’ या चित्रपटावर काम करीत होते. त्यावेळी सुनील यांनी या चित्रपटासाठी विनोद यांना व्हिलेनचा रोल आॅफर केला. विनोद यांनीदेखील त्यांची आॅफर लगेचच स्वीकारली. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरला. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली. - यशाच्या शिखरावर असताना १९८२ मध्ये विनोद खन्ना आध्यात्मिक गुरू रजनीश (ओशो) यांना शरण गेले. पुढे त्यांनी ग्लॅमर जगतातून एकप्रकारे संन्यासच घेतला होता. आश्रमात असताना ते भांडी धुणे तसेच माळी काम करीत होते. - विनोद यांनी अचानकच आश्रमात जाण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची पत्नी गीतांजली निराश झाली होती. पुढे दोघांनी घटस्फोट घेत एकमेकांपासून दुरावा निर्माण केला. विनोद आणि गीतांजली यांची अक्षय आणि राहुल अशी दोन मुले आहेत. - पुढे विनोद यांच्यात चित्रपटांविषयीचे आकर्षण पुन्हा वाढले. १९८७ मध्ये त्यांनी ‘इन्साफ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. - १९९० मध्ये विनोद यांनी कविताबरोबर दुसरा विवाह केला. कविता आणि विनोद यांना साक्षी आणि श्रद्धा नावाच्या दोन मुली आहेत. - विनोद खन्ना यांनी बॉलिवूडचा दबंग सलमान खान यांच्याबरोबर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सलमान खान विनोद खन्ना यांना लकी मानत असे. - विनोद खन्ना यांना इंजिनिअर बनायचे होते. मात्र त्यांचे वडील त्यांना बिझनेसमॅन बनविण्याच्या विचारात होते. मात्र नशिबाने विनोद यांना सुरुवातीला अभिनेता, त्यानंतर संन्यासी, पुढे पुन्हा अभिनेता, नंतर खासदार तथा केंद्रीय मंत्री बनविले. त्यांनी हेमा मालिनी यांच्याबरोबर अखेरच्या चित्रपटाचे नुकतेच शूटिंग पूर्ण केले होते.