देशात फसवणुकीचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. बदमाश लोक सर्वसामान्य माणसांना खोटी आश्वासनं देऊन त्यांना लुबाडतात. त्यामुळे कष्ट करुन पैसा कमवत असलेल्या सर्वसामान्य माणसांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. अशीच एक घटना नुकतीच उघडकीस आलीय. या घटनेत कार्तिक आर्यनच्या नावाखाली एका महिलेला तब्बल ८२ लाखांचा गंडा घालण्यात आलाय.
कार्तिकच्या नावाखाली महिलेची लाखोंची फसवणूक
मुंबईत घडलेली ही घटना आहे. ऐश्वर्या शर्मा असं फिर्यादीचं नाव असून तिला कार्तिकसोबत 'लव्ह इन लंडन' नावाचा सिनेमा बनवायचा होता. याचदरम्यान कार्तिकशी संपर्क साधण्यासाठी ऐश्वर्या यांनी कृष्ण कुमार रामविलासशी संपर्क साधला. कार्तिक आर्यनची भेट घडवून आणेल या नावाखाली बदमाश आरोपीने महिलेकडून तब्बल ८२ लाख रुपये उकळले. पण नंतर मात्र तो आरोपी गायब झाला.
याआधीही आरोपीच्या नावावर फसवणुकीचे गुन्हे
फिर्यादी ऐश्वर्या यांनी पोलिसात आरोपी कृष्ण कुमार रामविलासविरुद्ध तक्रार दाखल केली. तेव्हा पोलिसांकडे असलेला जुना रेकॉर्ड बघता त्याच्या नावावर असेच गुन्हे दाखल आहेत. कृष्ण कुमार हा अभिनेता आणि निर्मात्यांमध्ये एजंट असल्याचा दावा करतो. कृष्ण कुमारच्या नावावर फक्त मुंबईत नव्हे तर दिल्ली आणि चेन्नईतही असेच गुन्हे दाखल आहेत. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. कार्तिक आर्यनबद्दल सांगायचं झालं तर तो लवकरच 'चंदू चँम्पियन' सिनेमातून भेटीला येणार आहे. हा सिनेमा १४ जूनला सर्वत्र रिलीज होतोय. कबीर खान यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.