फोनपे या डिजिटल पेमेंट अॅपवर रविवारी सोशल मीडिया युजर्स अक्षरश: तुटून पडले. या अॅपविरोधात लोकांचा संताप इतका शिगेला पोहोचला की, टि्वटरवर #UninstallPhonePay हा हॅगटॅग ट्रेंड होऊ लागला. आता या डिजिटल पेमेंट अॅपवर लोक इतके भडकण्याचे कारण काय तर आमिर खान आणि आलिया भट. होय, आलिया व आमिर या कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. गेल्या काही दिवसांपासून आलिया व आमिर दोघेही वेगवेगळ्या मुद्यावरून टीकेचे धनी ठरले आहेत. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर नेपोटिजमच्या मुद्यावरून आलिया भट सोशल मीडियावर ट्रोल होतेय. सुशांत प्रकरणात अप्रत्यक्षपणे आलियाचे वडील महेश भट यांचे नाव आल्यानेही आलिया युजर्सच्या निशाण्यावर आली आहे. दुसरीकडे आमिर खान हा पाकिस्तानची पाठराखण करणा-या तुर्कीच्या फर्स्ट लेडी एमीन इर्दोगान यांची भेट घेतल्याने ट्रोल होतोय. अशात दोघांनाही फोनपेने ब्रँड अॅम्बेसेडर बनवल्याचे पाहून नेटक-यांचा संताप उफाळून आला. या पार्श्वभूमीवर रविवारी सोशल मीडिया युजर्सनी ‘फोनपे’ Uninstall करण्याची मागणी लावून धरली.
‘फोनपे’ने ‘देशद्रोही’ आमिर खान आणि ‘नेपोकिड’ आलिया भट यांना ब्रँड अॅम्बेसेडर बनवले आहे, तेव्हा ही अॅप डिलीट करा, असे एका युजरने लिहिले. ‘फोनपे’ Uninstall करा, देशासाठी काही करा, म्हणत वेगवेगळे स्क्रिनशॉट्स शेअर केलेत. यावरून अनेक मीम्सही शेअर करण्यात आले. यामुळे टि्वटरवर #UninstallPhonePay हा हॅशटॅग ट्रेंड करू लागला.
अलीकडे प्रदर्शित झाली जाहिरात‘फोनपे’ने आमिर व आलियाला ब्रँड अॅम्बेसेडर बनवल्यानंतर दोघांच्या जाहिरातींनी छोट्या पडद्यावर धुमाकूळ घातला आहे. ‘फोनपे’च्या एका जाहिरातीत आमिर व आलियाने एकत्र काम केले आहे.