Join us  

'आता हे कलाकार चांगलं नाव कमावतील'; नितीन गडकरींनीही केलं झुंड चित्रपटाचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2022 5:22 PM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील झुंड या चित्रपटाचे कौतुक केले आहे.

दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा झुंड (Jhund Movie) चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटातून नागराज मंजुळे यांनी हिंदी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेल्या झुंडने सर्वांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. 

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानपासून साऊथचा सुपरस्टार धनुषपर्यंत सगळ्यांनी 'झुंड' बनवणाऱ्या नागराज यांची पाठ थोपटली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील झुंड या चित्रपटाचे कौतुक केले आहे. नागराज मंजुळे हे उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत. त्यांनी सैराट सारखा चांगला चित्रपट केला आहे. त्यांना मी वेगळं प्रशस्तिपत्र देण्याची काही गरज नाही, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

नितीन गडकरी पुढे म्हणाले की, याआधी सिनेसृष्टीने त्यांना त्यांच्या कार्याचे प्रमाणपत्र दिले आहे. झुंड ही अत्यंत सुंदर कलाकृती आहे. लोकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी छोट्या कलाकारांना मोठी संधी दिली आहे. आता हे कलाकार चांगलं नाव कमावतील, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. 

मराठी अभिनेता सुबोध भावे यानेही 'झुंड' आणि नागराज यांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता जितेन्द्र जोशी याने तर या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज यांच्यावर कौतुकाचा असा काही खुद्द नागराजही भारावले. काही क्षणांपूर्वी जितेन्द्र जोशीने नागराज यांच्यासोबतीने इन्स्टावर लाईव्ह येत 'झुंड'चं भरभरून कौतुक केलं. झुंडसारखा सिनेमा फक्त नागराजचं करू शकतो. तू महानायक आणि महामानवाला एका फ्रेममध्ये आणलंस..., अशा शब्दांत त्याने नागराज यांचं कौतुक केलं.

रोहित पवारांनी देखील केलं कौतुक-

फॅन्ड्री, सैराटनंतर नागराजचा झुंड सिनेमा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडियातून या सिनेमाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही या चित्रपटाला चित्रपटात जाऊन पाहण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलंय. 'फँड्री' व 'सैराट'च्या यशानंतर नागराज मंजुळे यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण केलंय. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांच्या फुटबॉल टिमवर आधारित त्यांचा 'झूंड' हा चित्रपट समाजातील जातीभेदावर प्रकाश टाकतो. मी चित्रपटगृहात जाऊन झुंड बघणार आहे, तुम्हीही बघा !, असे ट्विट आमदार रोहित पवार यांनी केले आहे. 

टॅग्स :झुंड चित्रपटनितीन गडकरीबॉलिवूड