ख-या मोत्यांसाठी रखडले होते ‘मुगल-ए-आझम’चे शूटींग, वाचा एक रंजक किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 08:00 AM2019-06-15T08:00:00+5:302019-06-15T08:00:02+5:30
के. आसिफ बॉलिवूडचे एकमेव असे दिग्दर्शक आहेत, ज्यांनी एक सिनेमा तयार करण्यासाठी आयुष्याची 14 वर्षे खर्ची घातले. हा सिनेमा कुठला तर ‘मुगल-ए-आझम’.
बॉलिवूडच्या इतिहासात ज्या कुण्या दिग्दर्शकांची नावे सुवर्णाक्षरात नोंदवली जातील, त्यात के. आसिफ यांचे नाव सर्वांत आघाडीवर असेल. के. आसिफ बॉलिवूडचे एकमेव असे दिग्दर्शक आहेत, ज्यांनी एक सिनेमा तयार करण्यासाठी आयुष्याची 14 वर्षे खर्ची घातले. हा सिनेमा कुठला तर ‘मुगल-ए-आझम’.
खरे तर के आसिफ मुंबईत आले होते ते शिंपी बनण्यासाठी. (मुंबईत त्यांच्या मामाचे टेलरींगचे काम होते. त्यांचे मामा सिनेमासाठी कपडे पुरवण्याचे काम करत होते.) पण नियतीने त्यांना महान दिग्दर्शक बनवले. आसिफ यांनी आपल्या हयातीत केवळ दोन चित्रपटांचे दिग्दर्शन केले. एक म्हणजे 1944 साली प्रदर्शित झालेला ‘फूल’ आणि दुसरा ‘मुगल-ए-आझम’.
पृथ्वीराज कपूर, सुरैया आणि दुर्गा खोटे यांचेसारखी मोठी स्टारकास्ट असलेला ‘फूल’ सिनेमा सुपरहिट ठरला होता. या सिनेमाच्या यशानंतर के. आसिफ यांनी ‘मुगल-ए-आझम’ सिनेमा करण्याचा निश्चय केला. पण ‘मुगल-ए-आझम’ पूर्ण होण्यासाठी त्यांना 14 वर्षे प्रतीक्षा पहावी लागली. हा सिनेमा त्या काळातील सर्वात महागड्या सिनेमांपैकी एक होता. या चित्रपटासाठी अक्षरश: पाण्यासारखा पैसा खर्च केला गेला. उद्देश एकच, तो म्हणजे सगळे काही खरे वाटावे. खतीजा अकबर यांनी लिहिलेल्या ‘द स्टोरी आॅफ मधुबाला’ या चित्रपटात याचा उल्लेख आहे. चित्रपटाबद्दलचा एक किस्साही असाच रंजक आहे.
सलीम मोत्यांवरून चालत महालात दाखल होतो, असा एक सीन चित्रपटात आहे. या सीनसाठी नकली मोती मागवण्यात आले होते. पण के. आसिफ यांच्या डोक्यात मात्र वेगळेच काही सुरु होते. त्यांनी काय करावे तर, चित्रपटाच्या निर्मात्यांकडे १ लाख रूपयांची मागणी केली. यावर निर्मात्यांनी इतके पैसे कशाला हवेत? असा प्रश्न केला. के. आसिफ यांचे उत्तर तयार होते. या सीनसाठी मला खरे मोती हवेत, असे आसिफ म्हणाले. आसिफ यांचे हे उत्तर ऐकून निर्माते प्रचंड संतापले. तुला वेड तर लागले नाही ना? असा सवाल त्यांनी केला. तू नकली मोतीही वापरू शकतोस. असा काय मोठा फरक पडणार? असे निर्मात्यांनी आसिफ यांना सुनावले. पण आसिफ ठाम होते.
फरक पडेल. ख-या मोत्यांवरून चालणा-याच्या चेह-यावरचे भावही खरे असतील. मला तेच हवे आहे, असे आसिफ त्यांना म्हणाले. या वादात चित्रपटाचे शूटींग थांबले. एक दोन दिवस नाही तर २० दिवस. पण आसिफ बधेनात. अखेर त्यांच्या हट्टापुढे निर्मात्यांना झुकावे लागले आणि निर्मात्यांनी ईदीच्या रूपात आसिफ यांना १ लाख रूपये दिले. या लाख रूपयात आसिफ यांनी खरे मोती मागवलेत आणि याच ख-या मोत्यांवरून चालत सलीम महालात गेला.
के. आसिफ आयुष्यभर भाड्याच्या खोलीत राहिले. आयुष्यभर त्यांनी टॅक्सीने प्रवास केला. 9 मार्च 1971 रोजी या महान दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.