Join us

राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह; उर्फी जावेदच्या घरी होमहवन; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 13:08 IST

उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर देखील जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

बॉलिवूड अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आपल्या हटके, अतरंगी फॅशनने उर्फी सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर देखील जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. आता उर्फी जावेदच्या एका व्हिडीओनं सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. उर्फीने होमहवन करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशात उत्साह आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. देशभरात पुजा आणि होमहवन केले जात आहे. यातच उर्फी जावेदच्या घरी होमहवन करण्यात आलं. या व्हिडीओला तिनं 'राम आएंगे' हे गाणं बॅकग्राउंडला जोडलं आहे. तर कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, 'उत्सव साजरा करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन'. 

तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. एकाने लिहलं, "हे प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद ये क्या हुआ". तर एका युजरने  "उर्फी प्रमाणे प्रत्येक धर्माचे समर्थन केले पाहिजे",असे म्हणतं तिचं कौतुक केलं. "प्रत्येक धर्माचा आदर करणारी दयाळू व्यक्ती", "माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी तिच्या व्हिडिओने प्रभावित झालो आहे", अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या. तर अनेकांनी कमेंट करत 'जय श्रीराम' असे लिहिले आहे. 

दरम्यान, अयोध्येतील ८ एकर जमिनीत हे राम मंदिर उभारलं आहे. अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान अनेक सेलिब्रिटी हजेरी लावली आहेत. या भव्यदिव्य सोहळ्यासाठी अयोध्यानगरी नववधूप्रमाणे सजली आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देश- विदेशातील मंदिरांमध्ये उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय रामायण मालिकेत राम, लक्ष्मण व सीता यांच्या भूमिका साकारणारे अरुण गोविल, सुनील लहरी व दिपिका चिखलियादेखील अयोध्येत या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत.

टॅग्स :उर्फी जावेदसेलिब्रिटीबॉलिवूडअयोध्याराम मंदिर