भाजपा नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी उर्फी जावेदला (Uorfi Javed) बेड्या घालण्याची मागणी केली होती. उर्फी केवळ एकाच कारणाने चर्चेत असते, ते म्हणजे तिची ड्रेसिंग स्टाईल. सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत उर्फीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र तिच्यावर आतापर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. चित्रा वाघ यांनी ट्विट करत उर्फी जावेदवर निशाणा साधला. याला आता उर्फीने देखील उत्तर दिलं आहे.
"जर तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची संपत्ती जाहीर केली तर मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे" असं म्हणत चित्रा वाघ यांनी जाहीर आव्हान दिलं आहे. "मला ट्रायल किंवा हा मूर्खपणाच नको आहे. जर तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची संपत्ती जाहीर केली तर मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे. एक राजकारणी किती आणि कुठून पैसा कमावतो हे आधी जगाला सांगा. वेळोवेळी तुमच्या पार्टीतील काही पुरुष कार्यकर्त्यांवर शोषणाचे आरोप झाले आहेत. याविषयी तुम्ही कधीच काही करताना दिसल्या नाहीत" असं उर्फीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
"हे राजकारणी, वकील मूर्ख आहेत का?"
उर्फीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून देखील याबाबत एक ट्विट केलं आहे. "आणखी एका राजकारण्याने दाखल केलेल्या तक्रारीपासून माझ्या नव्या वर्षाची सुरुवात झाली. कारण या राजकारण्यांकडे खरं कोणतं कामच नाही. हे राजकारणी, वकील मूर्ख आहेत का? संविधानात असं कोणतंच कलमच नाही, ज्याच्या आधारे मला तुरुंगात पाठवलं जाईल. अश्लीलता आणि न्युडिटीची संकल्पना ही त्या त्या व्यक्तीनुसार बदलते. माझ्या शरीराचा ठराविक भाग दिसत नसेल, तर तुम्ही मला तुरुंगात पाठवू शकणार नाही. हे सर्व फक्त मीडियाचं लक्ष वेधून घेण्यासाठी सुरू आहे" असं म्हटलं आहे.
"अनधिकृत डान्स बार बंद करा"
उर्फीने चित्रा वाघ यांना यासोबतच एक सल्ला देखील दिला आहे. "माझ्याकडे तुमच्यासाठी एक चांगली कल्पना आहे. मानवी तस्करी आणि सेक्स ट्रॅफिकिंग यांसारख्या घटना अजूनही मुंबईत घडत आहेत, त्याबद्दल तुम्ही काहीतरी करण्याचा विचार करा. अनधिकृत डान्स बार बंद करा, जे अजूनही चालू आहेत" असं तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. चित्रा वाघ यांनी मुंबईचे आयुक्त तसेच सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था यांची भेट घेऊन उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. "उर्फी जावेद रूपी स्त्री देहाचा बाजार रोखा", अशा विषयाचे पत्र लिहून उर्फीच्या अश्लील कृत्याला आळा घाला असे चित्रा वाघ यांनी म्हटले.
"उर्फी जावेद रूपी स्त्री देहाचा बाजार रोखा"
चित्रा वाघ यांनी पत्रात म्हटले, "उर्फी जावेद या अभिनेत्रीने भररस्त्यात आपल्या देहाचे केलेले प्रदर्शन समाजमाध्यमावर चर्चेचा विषय बनले आहे. घटनेने दिलेला आचार, विचार स्वातंत्र्याचा हक्क इतक्या उपड्या नागड्या मनोवृत्तीत प्रकट होईल याची कोणीच कल्पना केली नसेल. स्त्री देहाचे असे मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यातील अत्यंत हीन, किळसवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृतीच्या सभ्यतेला कलंक आहे. या अभिनेत्रीने खासगी जीवनात काय करावे याच्याशी समाजाला काहीच देणेघेणे नाही मात्र केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाना मांडलेला बाजार चीड आणणारा आहे."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"