गेल्या वर्षी देशात कोरोनाची पहिली लाट आली आणि पाठोपाठ योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांचे अखंड उपदेश सुरु झालेत. आपल्या औषधांनी आणि योग करून कोरोनावर सहज मात करणे शक्य असल्याचा दावा त्यांनी केला. इथपर्यंत ठीक होते. पण यानंतर त्यांनी अॅलोपॅथी हे ‘मूर्ख विज्ञान’ असल्याचे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. त्यांच्या या वक्तव्याने देशभर संतापाची लाट आली. या लाटेचा अंदाज घेऊन बाबा रामदेव यांनी त्यांचे विधान मागे घेतले खरे, पण अद्यापही लोकांना राग शांत होताना दिसत नाहीये. आता अभिनेत्री व शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी बाबा रामदेव यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली आहे.उर्मिला यांनी ट्विटरवर एक ट्विट करत रामदेव बाबांना चांगलेच फटकारले.
‘ या बिझनेसमॅनला एखाद्या कोव्हिड रूग्णालयात जायला हवे. तिथे डॉक्टर, फ्रंटलाइन वर्कसोबत 24 तास उभे राहून मग बयानबाजी करायला हवी. हे सर्वात अमानुष, संतापजनक तितकेच घृणास्पद वक्तव्य आहे. हे कुणाचे टूलकिट आहे? त्यांची इतकी हिंमत होतेच कशी?’ असे ट्विट उर्मिला यांनी केले. आपल्या या ट्विटसोबत उर्मिलाने बाबा रामदेव यांचा एक व्हिडीओ सुद्धा पोस्ट केला आहे.उर्मिलांच्या या पोस्टवर सध्या कमेंट्सचा पाऊस पडतोय. अनेकांनी तू बोलतेय ते योग्य आहे. हा भोंदू बाबा आहे, असे म्हणत उर्मिलांच्या या ट्विटला पाठींबा दर्शवला आहे.
तापसीही संतापली
अभिनेत्री तापसी पन्नू हिनेही ट्विट करत रामदेव यांच्यावर निशाणा साधला़ आपल्या पोस्टमध्ये तिने रामदेवबाबांचा नामोल्लेख टाळला. पण तिचा इशारा त्यांच्याकडेच होता. ‘गेल्यावर्षी आपण सगळ्यांनी बाल्कनीत उभे होऊन कोरोना वॉरिसर्यसाठी टाळ्या वाजवल्या होत्या. कुठलाही राजा आपल्या सैनिकांशिवाय शक्तिहीन आहे,’ असे ट्विट तिने केले. सोबत कोरोना वॉरियर्सचा हॅशटॅगही पोस्ट केला. काय म्हणाले होते बाबा रामदेव?अॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे, असे म्हणत रामदेवबाबांनी देशभरात वाद उभा केला होता. हा वाद अंगलट येताच त्यांनी हे वक्तव्य मागे घेत असल्याचे म्हटले. त्याच्या दुस-याच दिवशी एका मुलाखतीमध्ये त्यांनी डॉक्टरांची खिल्ली उडविली़ 1000 हून अधिक डॉक्टर कोरोना लसीचे दोन डोस घेऊनही मृत्यूमुखी पडले आहेत. ते डॉक्टर स्वत:लाच वाचवू शकले नाहीत, असे रामदेव बाबा यांनी म्हटले़ डॉक्टर बनायचे असेल तर रामदेव बाबासारखे बना. ज्याच्याकडे कोणतीही डिग्री नाहीय, परंतू सर्वांचा डॉक्टर आहे. विदाऊट एनी डिग्री, डिग्निटी आय अॅम अ डॉक्टर. त्यांच्या या वक्तव्यावर भारतीय वैद्यकीय संघटनेने (आयएमए) आक्षेप घेतला आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रामदेवबाबांना वक्तव्य मागे घेण्यास सांगितले होते.