अमोल पालेकर यांच्या गोलमाल या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाले असले तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. या चित्रपटात भवानी शंकर ही भूमिका ज्येष्ठ अभिनेते उत्पल दत्त यांनी साकारली होती. त्यांच्या या भूमिकेचे आजही कौतुक केले जाते. उत्पल दत्त यांनी त्यांच्या कारकिर्दीत नरम गरम, रंगीबेरंगी, अमानुष यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. उत्पल दत्त यांचा आज म्हणजेच २९ मार्चला वाढदिवस असून त्यांचा जन्म बंगालमध्ये झाला होता.
उत्पल दत्त यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात १९४०ला इंग्रजी नाटकांमधून केली. त्यांना शेक्सपियर यांचे लेखन खूपच आवडायचे. त्यांनी त्यांच्या नाटकाचे प्रयोग भारताप्रमाणे पाकिस्तानमध्ये देखील केले होते. त्यांच्या ओथेलो या नाटकाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. इंग्रजी नाटकांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी बंगाली नाटकात काम करायला सुरुवात केली. बंगाली नाटकात एक अभिनेता म्हणून नव्हे तर एक दिग्दर्शक आणि लेखक म्हणून देखील आपली ओळख निर्माण केली. त्यांनी राजकारणावर भाष्य करणारी अनेक नाटकं लिहिली होती. यातील काही नाटकांमुळे विवाद देखील निर्माण झाला होता. त्यांच्या नाटकामुळे अनेक राजकीय पक्ष देखील अडचणीत आले होते. त्यामुळे त्यांच्या अंगार आणि कल्लोर या नाटकांसाठी त्यांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती. विशेष म्हणजे त्यांच्यावर कोर्टात कोणतीही केस चालवली न जाता त्यांना कैद करण्यात आले होते.
बंगाली नाटकात काम करत असतानाच त्यांनी बंगाली चित्रपटात देखील काम करायला सुरुवात केली. त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना गोलमाल, नरम गरम आणि रंगीबेरंगी या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. उत्पल दत्त यांना उतारवयात डायलिसीस करावे लागत होते. डायलेसिस करून घरी परत आल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यातच १९ ऑगस्ट १९९३ ला त्यांचे निधन झाले.