‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटाद्वारे फिल्मी करिअर सुरु करणाºया वाणी कपूरच्या खात्यात फार चित्रपट नाहीत. पण याऊपरही बॉलिवूडमध्ये तिने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज वाणीचा वाढदिवस. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाणीबाबत काही खास गोष्टी जाणून घेऊयात...
23ऑगस्ट 1988 रोजी दिल्लीत वाणीचा जन्म झाला. तिचे वडील शिव कपूर फर्निचर एक्सपोर्टचा व्यवसाय करतात. सोबत एक एनजीओही चालवतात. वाणीने अभिनेत्री बनू नये, असे तिच्या वडिलांचे पक्के मत होते.
मुलींनी लवकर लग्न करून संसार करावा, असे तिच्या वडिलांना वाटे. याचमुळे वाणीच्या बहिणीचे केवळ वयाच्या 18 व्या वर्षी लग्न झाले होते. वाणीला मात्र लग्न करून संसार करण्यात कुठलाही रस नव्हता.
टूरिझममध्ये आवड असल्याने सुरुवातीला वाणीने त्यातच पदवी घेण्याचा निर्णय घेतला. टूरिझममध्ये पदवी घेतल्यानंतर तिने काही दिवस हॉटेल इंडस्ट्रीमध्ये नोकरी केली. त्याआधी ओबेरॉय हॉटेल आणि जयपूरमधील एका रिसॉर्टमध्ये तिने इंटर्नशिपही केली. याच इंटर्नशिपच्या आधारावर तिला आयटीसी हॉटेलमध्ये नोकरी मिळाली.
तिचे सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्व पाहता हॉटेलमध्ये काम करत असतानाच तिला मॉडेलिंगच्या ऑफर्स मिळू लागल्या. पण वडिलांचा विरोध होता. या काळात आईने वाणीला आधार दिला. ती खंबीरपणे तिच्या पाठीशी उभी राहिली.
मॉडेलिंगच्या काळातच यशराज फिल्म्सच्या ‘शुद्ध देसी रोमान्स’साठी ऑडिशन्स सुरु असल्याचे तिला कळले. ती ऑडिशनला गेली. तिची निवड झाली. आत्तापर्यंत वाणीने केवळ तीन सिनेमे रिलीज झाले आहेत. पण तरीही बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते.
लवकरच टायगर श्रॉफ व हृतिक रोशन यांच्या ‘वॉर’ या चित्रपटात ती दिसणार आहे.