- संजय घावरे
दर्जा: *** (तीन स्टार)कलाकार : संजय मिश्रा, नीना गुप्ता, मानव विज, सौरभ सचदेवा, उमेश कौशिक, तान्या लाल, अभिलाष सिंग राजपूत, दिवाकर कुमारदिग्दर्शक : जसपाल सिंग संधू, राजीव बर्नवालनिर्माते : अंकुर गर्ग, लव रंजन, नीरज रुहीलशैली : थ्रीलर ड्रामाकालावधी : 1 तास 53 मिनिटे............................
Vadh Movie Review in Marathi : श्रद्धा वालकर हत्याकांडाने आज संपूर्ण देश हादरून गेला आहे. आजूबाजूला घडणाऱ्या गुन्हेगारी घटना मन विषण्ण करणाऱ्या आहेत. आज एखादा पापभिरू माणूसही वेळप्रसंगी हत्या करायला मागे पुढे पाहणार नाही इतकं वातावरण तापलं आहे. सर्वसामान्य व्यक्तीच्या हातूनही रागाच्या भरात गुन्हा घडू शकतो. वास्तवात हे शक्य नसलं तरी चित्रपटात असं घडेल तेव्हाच वास्तवातील गुन्हेगारांना काहीशी चपराक बसेल या हेतूनं दिग्दर्शक जसपाल सिंग संधू आणि राजीव बर्नवाल या चित्रपटात मानवी रूपातील राक्षसी वृत्तीचा ‘वध’ घडवून आणला आहे.
कथानक : व्याजानं पैसे घेऊन मुलाला परदेशी पाठवणाऱ्या शंभूनाथ मिश्रांची ही स्टोरी आहे. पापभिरू मिश्रांची पत्नीही धार्मिक वृत्तीची आहे. शाकाहारी असलेलं हे दाम्पत्य उंदरालाही न मारता पकडून बाहेर फेकण्याच्या विचारांचं आहे. मुलाचा कार्यभाग संपलेला असल्यानं तो कर्ज फेडण्याकडे दुर्लक्ष करतो. मिश्रा आजूबाजूच्या लहान मुलांची शिकवणी घेऊन उदरनिर्वाह करत असतात. त्याच मुलांपैकी एक असलेल्या नयनावर या दाम्पत्याचा जीव असतो. गुंड प्रजापती पांडे हा मिश्रांना पैशांसाठी त्रास देत असतो. एसपी शक्ती सिंग यांच्या सांगण्यावरून मिश्रा पांडेच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात जातात, पण त्याच रात्री पांडे मिश्रांच्या घरी येऊन विचित्र मागणी करतो. त्यानंतर तोल गेलेले मिश्रा काय करतात ते चित्रपटात आहे.
लेखन-दिग्दर्शन : चित्रपटाची वनलाईन आजच्या वातावरणाशी मिळतीजुळती आहे. सुरुवातीपासूनच चित्रपटाची गती काहीशी मंद वाटते. घटना वेगात घडत नाहीत. अत्याचाऱ्यांना शासन घडवण्याची दृश्ये चित्रपटापुरती योग्य वाटत असली तरी वास्तवात त्यांना शिक्षा देण्यासाठी न्यायव्यवस्था आहे. आई-वडीलांची ऐपत नसतानाही ते मुलांना परदेशी पाठवतात, पण त्यानंतर मुलं त्यांच्याशी कशी वागतात हा मुद्दा चांगला आहे. हत्येमागचं कारण, मनोहर कहानियां आणि पुरावे नष्ट करण्याचे सीन्स चांगले झाले आहेत. उगाच आढेवेढे न घेता नायकानं खलनायकाचा वध करण्याचा सीन टाळ्या-शिट्या मिळवणारा आहे. गुन्ह्याची कबूल देऊनही पोलिसांनी ती कहाणी असल्याचं समजणं आणि पोलिसांनी विचारल्यावर नकार देणं हे नकळतपणे हास्य फुलवणारं आहे. क्लायमॅक्समधील हत्यारं मिळण्याचा मुद्दा आणि नायकाचा खुलासा अधिक स्पष्टपणे यायला हवा होता. पार्श्वसंगीत, सिनेमॅटोग्राफी, कलादिग्दर्शन चांगलं आहे.
अभिनय : आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका रंगवणाऱ्या संजय मिश्रांनी आपली व्यक्तिरेखा अतिशय संयतपणे साकारली असून, त्यांचा अफलातून अभिनय ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. त्यांना नीना गुप्तांची सुरेख साथ लाभली आहे. सुरुवातीला बडबड करणारी आणि नंतर अबोला धरणारी पत्नी त्यांनी साकारली आहे. सौरभनं साकारलेला खलनायकही चीड निर्माण करणारा आहे. मानव विजच्या रूपातील पोलिस अधिकारी कन्फ्युज करणारा आहे. इतर कलाकारांनीही चांगलं काम केलं आहे.
सकारात्मक बाजू : वनलाईन, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, पार्श्वसंगीत, सिनेमॅटोग्राफीनकारात्मक बाजू : संथ गती, संकलन, कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याचं समर्थन करणं योग्य नाही.
थोडक्यात : चित्रपटाची गती संथ असली आणि उणीवा राहिल्या असल्या तरी संकट येण्यापूर्वी साधव होण्याचा इशारा देणारा हा चित्रपट एकदा अवश्य पहायला हवा.