नाना पाटेकर यांच्या 'वनवास' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. 'गदर' आणि 'गदर २'चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. या सिनेमाची गेल्या अनेक महिन्यांपासून चांगलीच चर्चा होती. अखेर आज हा सिनेमा भारतात सगळीकडे रिलीज झालाय. नाना पाटेकर यांचा 'वनवास' सिनेमा नेटकऱ्यांना कसा वाटला याचे रिव्ह्यू समोर आलेत. 'वनवास' सिनेमाचे मॉर्निंग शो पाहिल्यावर ट्विटरवर नेटिझन्सनी त्यांच्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. जाणून घ्या.
वनवास सिनेमा नेटकऱ्यांना कसा वाटला?
नवनीत मुंध्रा नामक एका युजरने लिहिलं आहे की, "अनिल शर्मा यांचा वनवास सिनेमा एक दुर्मिळ सिनेमा रत्न आहे. असे सिनेमे अनेक दशकांनंतर एकदा बनतात. हा एक कौंटुंबिक ड्रामा असून मुलांचं संगोपन कसं करावं, याचं महत्व मार्मिक रुपात दाखवतो."
ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत प्रेक्षक नाना पाटेकर यांचा वनवास सिनेमा पाहत आहेत. सिनेमा पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलेलं दिसतंय.
याशिवाय विवेक मिश्रा यांनी लांबलचक रिव्ह्यू लिहून त्यांचं मत मांडलंय की, "मी या सिनेमाला ४ स्टार देतो. वनवास सिनेमा हा मास्टरपीस आहे. कौटुंबिक मूल्यांचं महत्व हा सिनेमा आपल्याला शिकवतो. अनिल शर्मा यांनी त्यांच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाने सिनेमा सजवला आहे. पालक आणि मुलांमधील खास नात्याला हा सिनेमा दर्शवतो. नाना पाटेकरांचा आजवर कधीही न पाहिलेला वेगळा अवतार आपल्या हृदयाला स्पर्श करतो. त्यांचा अभिनय पाहून डोळ्यात पाणी येतं."
अशाप्रकारे नाना पाटेकर यांचा 'वनवास' सिनेमा नेटकऱ्यांना आवडलेला दिसतोय. हा सिनेमा आज सगळीकडे रिलीज झाला असून पुढील तीन दिवसात अर्थात वीकेंडमध्ये प्रेक्षकांचा सिनेमाला कसा प्रतिसाद मिळणार, हे पाहणं कुतुहलाचा विषय आहे.