करण जोहर दिग्दर्शित कलंक चित्रपटाचे चित्रीकरण काही दिवसांपूर्वी सुरू झाले होते. या चित्रपटात अभिनेता वरूण धवन आणि आलिया भट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. वरूण आणि आलियाने या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. वरूण धवनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती नुकतीच दिली आहे.
'कलंक'चे चित्रीकरण पूर्ण केले. हा आलियासोबतचा चौथा चित्रपट होता. ती नेहमीच माझी आवडती अभिनेत्री आहे. या चित्रपटातून आमच्या चाहत्यांना उत्तम काही तरी देण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. चित्रपटात आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त आणि माधुरी दीक्षितसोबत काम करण्याचा अनुभव उत्तम होता, असे वरूणने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
'कलंक' चित्रपटाच्या कथेची कल्पना करण जोहर आणि त्याचे वडील यश जोहरला पंधरा वर्षांपूर्वी सुचली होती. मात्र या चित्रपटाला कित्येक वर्ष मुहूर्त सापडत नव्हता. अखेर आता हा चित्रपट बनत असून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षित, संजय दत्त, आलिया व वरूण यांच्याव्यतिरिक्त आदित्य रॉय कपूर व कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १९ एप्रिल, २०१९ला प्रदर्शित होणार आहे. आलिया आणि वरूणने याआधी 'स्टूडंट ऑफ द ईअर', 'बद्रीनाथ की दुल्हनिया', 'हंम्टी शर्मा की दुल्हनिया'सारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे, आता हा सिनेमाही प्रेक्षकांना भावतो की नाही हे पाहणे कमालीचे ठरेल.