वरुण धवनच्या आगामी 'बेबी जॉन' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. सिनेमाचा टीझर, ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सिनेमात वरुण धवन, जॅकी श्रॉफ यांची प्रमुख भूमिका आहे. अशातच या सिनेमातील पहिल्या गाण्याची सर्वांना उत्सुकता होती. हे गाणं म्हणजे 'नैन मटक्का'. विशेष गोष्ट म्हणजे या गाण्यात साऊथ क्वीन कीर्ती सुरेशसोबत वरुण धवन धमाल डान्स करताना दिसणार आहे. अखेर हे गाणं नुकतंच रिलीज झालंय. गाणं रिलीज होताच प्रेक्षकांनी गाण्याला चांगली पसंती दिलीय.
'बेबी जॉन'मधील नैन मटक्का गाणं
दिलजीत दोसांझच्या आवाजाने नटलेलं 'नैन मटक्का' गाणं रिलीज झालंय. या गाण्याचे शब्द आणि वरुण-कीर्तीचा धमाल डान्स सध्या चर्चेचा विषय आहे. सध्या जगभरात स्वतःच्या आवाजाने सर्वांना मोहित करणारा दिलजीत दोसांझने हे गाणं गायलं आहे. या गाण्याच्या व्हिडीओत कीर्ती सुरेश आणि वरुण धवनची जबरदस्त केमिस्ट्री दिसत असून दोघांच्या डान्सची जुगलबंदीही सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. गाण्यात दिलजीतची झलकही पाहायला मिळते. 'नैन मटक्का' गाणं रिलीज होताच अल्पावधीत व्हायरल झालंय.
'बेबी जॉन' कधी रिलीज होणार?
वरुण धनवचा आगामी 'बेबी जॉन' हा सिनेमा २५ डिसेंबर २०२४ ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. शाहरुखच्या 'जवान' सिनेमाचा दिग्दर्शक अॅटली या सिनेमाचा प्रेझेंटर आहे. 'बेबी जॉन'मध्ये वरुण धवन, जॅकी श्रॉफ, कीर्ती सुरेश, वामिका गाबी हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. कालीस यांनी 'बेबी जॉन'च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ख्रिसमसच्या मुहुर्तावर रिलीज झालेला 'बेबी जॉन' यशस्वी होणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.