आपल्या दमदार अभिनयशैलीमुळे आज अनेकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे वरुण धवन (Varun dhawan). २०१२ मध्ये अभिनयाची कारकिर्द सुरु करणाऱ्या या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. 'स्टुडंट ऑफ द इअर' या सिनेमातून त्याने कलाविश्वात पदार्पण केलं आणि पाहता पाहता लोकप्रिय झाला. विशेष म्हणजे वरुणचे वडीलदेखील कलाविश्वात सक्रीय आहेत. मात्र, त्यांनी कधीही वरुणला कोणत्याच कामात मदत केली नाही. याविषयी एका मुलाखतीत त्याने भाष्य केलं.
आपल्या अभिनशैलीमुळे चर्चेत येणाऱ्या वरुणने त्याच्या शालेय जीवनातील एक किस्सा शेअर केला आहे. एकेकाळी धीरुभाई अंबानी शाळेत वरुणला प्रवेश घ्यायचा होता. त्यामुळे त्याने वडिलांकडे मदत मागितली होती. मात्र, त्याच्या वडिलांनी मदत करण्यास साफ नकार दिला.
"मला चांगलं आठवतंय मी १० वीत असताना धीरुभाई अंबानी शाळा नव्यानेच सुरु झाली होती. त्यामुळे माझे सगळे मित्र त्या शाळेत प्रवेश घेत होते. मलाही त्या शाळेत ज्याचं होतं त्यामुळे मी वडिलांना सांगितलं की, एक फोन करुन मला त्या शाळेत प्रवेश मिळवून द्याल का? त्यावेळी एंट्रेन्सचा रिझल्ट लागला पण माझं नाव कुठेच नव्हतं. त्यामुळे मी वडिलांना विचारलं की तुम्ही फोन केला का? त्यावर वडिलांनी नकार दिला", असं वरुण म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "वडिलांनी फोन न केल्यामुळे मी त्या मागचं कारण विचारलं. त्यावर तू अॅडमिशन घेण्याच्या लायकीचा नाहीस असं त्यांनी थेट मला सांगितलं." दरम्यान, वरुणला हा किस्सा कायमस्वरुपी लक्षात राहिला आहे. आपल्या अभिनयशैलीमुळे चर्चेत येणारा वरुण लवकरच नितेश तिवारीच्या बवाल सिनेमात झळकणार आहे.