अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) सध्या चर्चेत आहे. नुकतीच त्याची 'सिटाडेल:हनीबनी' सीरिज रिलीज झाली. यातील त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं. तर आता त्याचा 'बेबी जॉन' सिनेमा रिलीज होणार आहे. याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून चाहत्यांमध्ये सिनेमासाठी उत्सुकता आहे. दरम्यान सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने तो एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी झाला. यावेळी त्याने गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना देशाचे हनुमान अशी उपमा दिली.
अभिनेता वरुण धवन काल 'आज तक'च्या एका इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. यावेळी गृहमंत्री अमित शाह स्टेजवर होते तर वरुण धवन खाली बसला होता. वरुणने एखाद्या पत्रकाराप्रमाणेच अमित शाहांना काही प्रश्न विचारले. तेव्हा अमित शाहांनीही मजेशीर उत्तरं दिली. वरुण म्हणाला, "तुम्ही जे जे सांगत आहात त्यावरुन मी प्रभावित झालो आहे. माझा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की, 'भगवान श्रीराम आणि रावण यांच्यातील सर्वात मोठा फरक कोणता?' यावर अमित शाह म्हणतात, 'काही लोक धर्म ही आपली जबाबदारी मानून काम करतात तर काही लोक स्वत:च्या फायद्यासाठी धर्माचा वापर करतात. हाच श्रीराम आणि रावण यांच्यातला फरक आहे. श्रीराम धर्माला अनुसरुन जगले तर रावणाने धर्माला त्याच्या मर्जीप्रमाणे बदलण्याचा प्रयत्न केला."
यानंतर वरुण म्हणतो, 'एका पॉईंटला मी असा विचार केला होता की रावणाला त्याच्या ज्ञानाचा अहंकार आहे तर श्रीरामांना अहंकाराचं ज्ञान आहे.' यावर अमित शाह म्हणतात,'दोन्ही अहंकाराच्या व्याख्या आहेत.' पुन्हा वरुण म्हणतो, 'मी तुम्हाला टीव्हीवरच बघितलं आहे. आज पहिल्यांदा लाईव्ह बघतोय. काही लोक तुमचा उल्लेख राजकारणातले चाणक्य असता करतात. पण मी सांगू इच्छितो की देशाचे हनुमान आहात जे कोणताही स्वार्थ न बाळगता देशसेवा करत आहात. जितक्या स्पष्टपणे ते आपले विचार मांडतात हे आम्ही कलाकार सुद्धा स्क्रीप्ट वाचून बोलू शकत नाही."
या कार्यक्रमात अमित शाह वरुण धवनला गंमतीत म्हणतात, 'तू सुद्धा यांच्यासारखा पत्रकार होऊ नको'. यावर वरुण लगेच म्हणतो, 'नाही, सर'.
वरुण धवनचा 'बेबी जॉन'२५ डिसेंबर रोजी रिलीज होत आहे. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेश, वामिका गब्बी आणि जॅकी श्रॉफ खलनायक आहेत. लोकप्रिय साऊथ दिग्दर्शक अॅटलीचा हा सिनेमा आहे.