येणाऱ्या काळात OTT हेच भवितव्य आहे, हे अनेकांनी स्वीकारलं आहे. कोरोना काळात याच ओटीटीनं प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. कोरोनानंतर चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू झालीत. पण ओटीटीचा प्रभाव अद्यापही जाणवतोय. चित्रपटगृहांत येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या कमी होताना दिसतेय. बॉलिवूडकरांनीही काळानुरूप हा बदल स्वीकारला आहे. अलीकडच्या काळात बॉलिवूडचे अनेक स्टार्स ओटीटीकडे वळले. अर्थात अपवादही आहेत. काही बॉलिवूड स्टार्स अद्यापही ओटीटीपासून लांब आहेत. अभिनेता वरूण धवन (Varun Dhawan ) नेमका याचबद्दल बोलला.‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत वरूण धवनने यानिमित्ताने सलमान खानला (Salman Khan)एक खास सल्लाही दिला. कोणते स्टार्स ओटीटीवर कधीही येणार नाहीत? कोणत्या स्टार्सनी ओटीटीवर यायला हवं? असा प्रश्न या मुलाखतीत वरूणला करण्यात आला. यावर वरूणने इंटरेस्टिंग उत्तर दिलं.
काय म्हणाला वरूण?सिद्धार्थ मल्होत्रा व शाहिद कपूर यांनी ओटीटी डेब्यू करावं, अशी इच्छा वरूणने व्यक्त केली. सिद्धार्थ आणि शाहिद लवकरच एका मोठ्या सीरिजमधून डिजिटल डेब्यू करणार आहेत आणि त्याबद्दल त्यांनी माहितीदेखील दिली आहे. या दोघांखेरीज अमिताभ बच्चन यांनी लवकरच ओटीटीवर एका लिमिटेड सीरिजमध्ये झळकायला हवं, अशी माझी इच्छा आहे. अमिताभ बच्चन ओटीटीवर येणार असतील तर मी कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मची मेंबरशिप घ्यायला तयार आहे, असं वरूण म्हणाला.
सलमानने मात्र कधीच ओटीटीवर येऊ नये...होय, सलमानने कधीच ओटीटीवर येऊ नये, अशी इच्छा वरूणने या मुलाखतीत बोलून दाखवली. सलमान सरने कधीच ओटीटीवर येऊ नये. मी त्याला ओटीटीवर पाहू इच्छित नाही. ईदच्या मुहूर्तावर जेव्हा भाईजानचा चित्रपट येतो, तेव्हा मी खूश्श असतो. भाईजानला थिएटरमध्ये पाहण्यातच मज्जा आहे. त्यामुळे त्याने कधीच ओटीटीवर येऊ नये, असं वरूण म्हणाला.
आलियासोबत करायचंय काम...या मुलाखतीत वरूणने आलियासोबत काम करण्याची इच्छाही बोलून दाखवली. दोघंही ‘कलंक’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. 2019 साली हा सिनेमा रिलीज झाला होता. आलियाबद्दल तो म्हणाला, आलिया मला खूप प्रिय आहे. तिच्यासोबत माझी पडद्यावरची केमिस्ट्री शानदार आहे. आम्ही दोघंही चांगले मित्र आहोत. तिच्यासोबत पुन्हा काम करायला मला आवडेल. लवकरच माझी ही इच्छा पूर्ण व्हावी, असंही तो म्हणाला.वरूणच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो नुकताच ‘जुग जुग जियो’ या चित्रपटात झळकला होता. सध्या तो ‘भेडीया’ या चित्रपटात बिझी आहे.